मुस्लिम महिलांचे उत्थान केवळ एक कारण खरे लक्ष शरियत आहे : ओवैसी

    दिनांक  23-Jan-2018

 
औरंगाबाद : तिहेरी तलाक सद्द करण्याचा कायदा म्हणजे सरकारचे एक षडयंत्र आहे. या काद्यासाठी देण्यात आलेले 'मुस्लिम महिला उत्थानाचे' कारण केवळ एक बहाणा आहे, केंद्र सरकारचे खरे लक्ष्य शरियत कायदा आहे. जर आता आपण काही केले नाही तर एके दिवशी मुस्लिमांच्या शरियत वर देखील बंदी येईल. असे विवादास्पद प्रतिपादन एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले. औरंगाबाद येथे आोयजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
 
 
 
 
तिहेरी तलाक प्रथा चुकीचीच आहे, आणि जो कुणी आपल्या पत्नीला तिहेरी तलाक देईल त्याला त्वरित समाजातून बहिष्कृत केले पाहीजे, असेही ते यावेळी म्हणाले. असदुद्दीन ओवैसी हे महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले असून त्यांची पहिली जाहीर सभा औरंगाबाद येथे काल आयोजित करण्यात आली होती. यावेळी एमआयएम पक्षाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.
 
राजपूत समाजासाठी चित्रपटावर बंदी घातली जाते मात्र मुस्लिम समाजाचा विचार कुणी करत नाही :
 
यावेळी पद्मावत चित्रपटाविषयी वादावर ते म्हणाले की, "देशात १४ टक्के मुस्लिम समाज आहे, मात्र त्यांच्याविषयी कुणीच बोलत नाही, त्यांच्या समस्यांवर विचार केला जात नाही, पण राजपूत समाजासाठी एक संपूर्ण चित्रपटावर बंदी घालण्यात येते. चित्रपटाचे नाव बदलले जाते. तीनशे कट पाडले जातात. तो समाज फक्त चार टक्के आहे. आणि मुस्लिम समाज हा १४ टक्के असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. " असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.
 
 
 
 
देशात अनेक प्रश्न असताना सुद्धा तिहेरी तलकच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली, मीडिया ट्रायल घेतला गेला आणि तिहेरी तलाक विरोधी पक्षपाती कायदा पारित करून घेतला. हे सरकार फक्त मुस्लिम द्वेषातून हे सगळे करत आहे. याला मुस्लिमांनी एकत्र येऊन उत्तर दिले पाहिजे. असेही ते यावेळी म्हणाले.