‘पॅकेज’वाल्या नोकर्‍या सोडून ते ‘जमीन’दोस्त झाले

22 Jan 2018 08:22:55

- बहाद्दरपूरची लाल व पिवळी ढोबळी मिरची सातासमुद्रापार
 
- उच्चशिक्षित कुटुंबाने स्वप्न सत्यात आणले




( कॅप्सीकम म्हणजे बोलभाषेत ढोबळी मिरचीच्या झाडांनी स्वप्नील माथने या तरुणाचे आयुष्य गोड केले आहे.)

अमरावती : शेतकर्‍यांची पोरं शिकतात आणि नोकरीसाठी जमिनी विकतात, हे आजचे वास्तव आहे, मात्र अमरावती शहरांत राहणार्‍या माथने बंधूंनी उच्चशिक्षणानंतर गवसलेल्या ‘पॅकेज’वाल्या नोकर्‍या सोडून बहाद्दरपूरला जमीन विकत घेतली आणि त्यात अत्याधुनिक पद्धतीने शेती करून यशाची पहिली पायरी गाठली आहे. जमिनीशी त्यांनी केलेली दोस्ती आता फळली आहे...

नावांत काय असते, असे म्हणतात; पण स्वप्न सत्यांत आणणार्‍या या तरुणाचे नाव स्वप्नील आहे. अमरावतीला साईनगरात हे कुटुंब राहते. स्वप्नीलचे एमबीए-मार्केटींग पर्यंतचे शिक्षण झाले आहे. आयसीआयसीआय कंपनीत व्यवस्थापक म्हणून नागपुरात तीन वर्षे त्याने नोकरी केली. याचकाळात स्वप्नील यांचे मोठे बंधू संदीप यांनी बहाद्दरपूर येथे अडीच एकर शेत घेतले होते. अहमदाबाद येथे नोकरी करणार्‍या संदीप यांनी स्वप्नील यांना विदेशी भाजीपाला व त्यांच्या उत्पादनाची माहिती देऊन आपल्या शेतात त्याचे उत्पादन घेणे शक्य असल्याचे पटवून दिले. भावनी दिलेला सल्ला व पाठबळाच्या जोरावर संदीपने नोकरी सोडली. सर्वप्रथम त्यांनी अडीच एकर शेतापैकी १ एकर शेतात ग्रीननेट शेड उभारले. त्यासाठी त्यांना अनुदानही मिळाले. पहिल्यावर्षी त्यांनी हिरवी ढोबळी मिरचीची लागवड केली. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. मग त्यांनी पूर्वीच ठरल्याप्रमाणे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाल व पिवळ्या ढोबळ्या मिरचीची ४ हजार झाडे नियोजित पद्धतीनुसार लावली. या मिरचीची रोपे त्यांनी नेदरलँडच्या कंपनीकडून घेतलेल्या बियाण्यांपासून तयार केली होती. नोव्हेंबरपासून त्याचे उत्पादन सुरू झाले. या मिरचीला मोठ्या शहरातील मॉल, हॉटेलमध्ये मागणी असल्यामुळे त्यांनी मुंबई व रायपूर येथील ग्राहक शोधले. कुवैत येथे ही मिरची पाठविण्याची संधी त्यांना मिळाली. आतापर्यंत उत्पादीत झालेली ३० क्विंटल मिरची त्यांनी या तीन ठिकाणीच पाठविली आहे. त्यांना दरही चांगला मिळाला. ५५ हजाराचा खर्च वगळता त्यांना ३ लाखाचे उत्पन्न झाले. मागणी व भाव चांगला असल्यामुळे स्वप्नील यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा अकरा हजार झाडे लावली आहे. मार्चपासून येणार्‍या उत्पादनाचे आंतराष्ट्रीय मानांकनानुसार पॅकींग करून विक्रीचे नियोजनही त्यांनी केले आहे. मुंबई, रायपूर या मोठ्या शहरासोबतच कुवेत, दुबईतही त्यांची मिरची जाणार आहे. त्यातून भरघोस उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. १० ते १५ जणांना रोजगारही त्यांनी दिला आहे. या कार्यात त्यांना भाऊ संदीप, वहीनी व एमई झालेली पत्नी राजश्री यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
 
 
 

भावाच्या प्रोत्साहनानेच शक्य : संदीप माथने

मोठ्या भावाने प्रोत्साहन दिल्यामुळेच हे शक्य झाले आहे. शिक्षणातून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर मी नवनवीन माहिती घेतली व प्रामाणिक प्रयत्न करून कृती केली. ती यशस्वी झाली आहे. देशात विदेशी भाजीपाल्याची मागणी वाढली आहे आणि या भाजीपाल्याचे उत्पादन घेणे आपल्याला शक्य आहे. विशेष म्हणजे या मालाला विदेशातही ग्राहक मिळतात. शेतकर्‍यांना माहिती हवी असल्यास त्यांनी ७७९८३४७७६६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. भविष्यात आणखी काही विदेशी भाजीपाल्याची लागवड करण्याचा मानस संदीप यांनी ‘तभा’शी बोलताना व्यक्त केला..


- गिरीश शेरेकर
 
Powered By Sangraha 9.0