गणेश शारदा

    दिनांक  22-Jan-2018   
 
 
 
आज माघ शुद्ध पंचमी. सरस्वती पूजन. आज भारतात सर्वत्र सरस्वतीची पूजा केली जाते. सरस्वती ही वाचेची, वाणीची आणि संगीताची देवता असल्याने मंदिरातून, शाळातून, संगीत विद्यालयातून आज सरस्वतीची पूजा केली जाते.
 
 
सरस्वती ही वाचेची म्हणजेच – परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरीची देवता आहे. ती स्फूर्ती, विचार, भाषा आणि शब्दाची देवता आहे. स्फूर्तीला जी शब्दात रूपांतरित करते ती सरस्वती. खोल मनामध्ये जन्मलेल्या ठिणगीला जी अर्थ देते ती सरस्वती! जी प्रतिभेला आवाजात व्यक्त करते ती सरस्वती! म्हणूनच सरस्वती ही आवाजाची, शब्दाची, पद्याची, गद्याची आणि संगीताची देवता आहे.
 
 
काही ठिकाणी, सरस्वतीचे एक रूप शारदा ही गणेशाची अर्धांगिनी समजली जाते. गणेश – शरदेची जोडी विलक्षण सुंदर आहे. सृजनशील आहे. एकमेकांना पूरक असणारी आहे. शारदा ही शक्ती असल्याने ती दिसत नाही, तिला रूप नाही. तर गणेश हा रूपाचा देव आहे!
 
 
गणेश हा गणांचा म्हणजेच अक्षरांचा आणि लिखित अंकांचा देव आहे! तो गणपती, गणाधीश, गणाधिपती, गणाध्यक्ष, गणेश आहे! तो गणित, गणती आणि संगणकाचा देव आहे. आवाजाला रूप देणारा देव आहे. लिखाणाचा देव आहे. अथर्वशीर्षात गणपतीला “त्वमेव सर्वं कर्तासी” म्हणले आहे. त्यामुळे गणेश हा शब्दाला कृतीत आणणारा देव आहे.
 
 
शारदा जर आवाज आहे, तर गणेश अक्षर आहे.
 
शारदा भाषा आहे, तर गणेश लिपी आहे.
 
शारदा मौखिक वेद आहे, तर गणेश लिखित ग्रंथ आहे.
 
शारदा संगीत आहे, तर गणेश नृत्य आहे.
 
शारदा शब्द आहे, तर गणेश कृती आहे.
 
 
मानवाच्या निर्मितीला तीन पायऱ्या आहेत – विचार, उच्चार आणि आचार. या पैकी पहिल्या दोन पायऱ्यांची देवता शारदा आहे, तर तिसऱ्या पायरीचा देव आहे गणेश! असे पाहता लक्षात येते की मानवाची प्रत्येक निर्मिती ही शारदा आणि गणेशाची लीला आहे. मग ती निर्मिती काव्य असो, भाषण असो, संविधान असो, चित्र असो, शिल्प असो, नृत्य असो, मंदिर असो, sky scrapper असो, flyover असो काहीही असो!
 
 
प्रत्येक मनुष्यात गणेश आणि शारदा विराजमान असतात. पण त्यांची उपासना करणाऱ्याला गणेश आणि शारदा प्रसन्न होतात! मग तो मनुष्य दिलेला शब्द पाळू शकतो. बोललेलं खरं करू शकतो. इतकेच नव्हे तर तो जे बोलेल ते खरे होते. त्या मनुष्याचे वर्णन तुकाराम महाराज करतात -
 
 
बोले तैसा चाले । त्याची वंदिन पाऊले ।। 
अंगे झाडीन अंगण । त्याचे दास्यत्व करीन ।।
त्याचा होईन किंकर । उभा जोडोनि कर ॥
तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव ।।
 
काल माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंती. आणि आज माघ शुद्ध पंचमीला सरस्वती पूजनाच्या निमित्ताने गणेश-शारदेच्या रूपाचे चिंतन.
 
- दिपाली पाटवदकर