हे तर बावचळलेले सरकार : अजित पवार

    दिनांक  20-Jan-2018
 
 
 
लोहा (नांदेड) : राज्य सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही आणि म्हणूनच हे सरकार म्हणजे बावचळलेले सरकार आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सध्या सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनात आज नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदारसंघात सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. यांच्या सरकारच्या काळात शाळा बंद पाडल्या गेल्या आहेत. या सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही असे पवार यावेळी म्हणाले. हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधणे, लोकांचे प्रश्न जाणून घेणे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख उद्देश आहे, असेही त्यांना यावेळी सांगितले. या सरकारच्या काळात कोणतेही महामंडळ नीट चालत नाही. कोणत्याही महामंडळाला निधी दिला जात नाही असाही आरोप पवार यांनी यावेळी केला. या सभेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, उपस्थित होते.
 
 
 
लोहा-कंधार मतदारसंघात मागच्या तीन वर्षात जी बंधाऱ्यांची कामे झाली, ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली. या सरकारचे त्याकडे लक्ष नाही. गेल्या तीन वर्षांत सरकारचा फक्त अभ्यासच चालू आहे. हे सरकार पास होण्याचे काही नाव घेत नाही. लहान विद्यार्थ्यांनाही प्रश्न पडलाय की आम्ही एका वर्षात पास होतो. मग सरकारला पास व्हायला तीन वर्षे कशी काय लागतात? अशा शब्दात त्यांनी सरकारच्या उदासीन धोरणांची खिल्ली उडवली.
 
 
 
सेनेचा वाघ आता कासव झाला आहे -

याच सभेत अजित पवार यांनी सत्ताधारी शिवसेनेवरही निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १५ वर्षे सरकार चालवले, मात्र एका पक्षाचा आमदार कधीही दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर प्रचारासाठी गेला नाही असे त्यांनी सांगितले. मात्र शिवसेनेचे नांदेडचे आमदार नांदेड महानगरपालिका निवडणूकीत भाजपचा प्रचार करत होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. बाळासाहेब ठाकरे असते तर असे झाले असते का असा प्रश्न उपस्थित करत सेनेचा वाघ आता कासव झाला आहे असा टोला पवार यांनी लगावताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

 
 
पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की ज्या पद्धतीने तरुणाई आणि महिला वर्ग आपल्या ‘हल्लाबोल’ आंदोलनात सहभागी होत आहेत, त्याने हे स्पष्ट होते की परिवर्तन नक्कीच होईल. सरकारचे ‘मेक इन इंडिया’ नसून ‘फेक इन इंडिया’ आहे. लोहामध्ये या आंदोलनाची ठिणगी पडली आहे, पण लवकरच या आंदोलनाचे रुपांतर ज्वालामुखीत होईल. भाजपने सांगितले होते की २ कोटी तरुणांना रोजगार देऊ. पण देशात फक्त एकाच व्यक्तीला रोजगार मिळाला आणि ती व्यक्ती म्हणजे अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा, अशी कोपरखळी देखील मलिक यांनी यावेळी मारली.
 
 
 
 

अजित पवार यांचे लोहा येथील हल्लाबोल सभेतील संपूर्ण भाषण -