अफवांवर विश्वास ठेवू नका : बीड पोलीस

    दिनांक  02-Jan-2018

 
बीड : अन्य जिल्ह्यातील एका अप्रिय घटनेच्या अनुषंगाने काही समाज विघातक शक्ती सोशल मिडीयाचा वापर करून असत्य, तर्कहीन आणि सामाजिक शांतता भंग करणारे संदेश प्रसारित करत आहेत. परंतु, अश्या बातम्यांमध्ये कसलेही तथ्य नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन बीड जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे.
 
फेसबुक, व्हाॅट्सॲप, ट्वीटर आदी सोशल मीडियातून आक्षेपार्ह्य मजकूर तयार करून पसरविणे, प्रसारीत (फाॅरवर्ड) करणे हा दाखलपात्र अपराध आहे. जर कोणी अशा कोणत्याही स्वरूपाच्या सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडवणाऱ्या अफवा पसरवित असेल तर त्याची माहिती तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला ०२४४२ - २२२३३३ या क्रमांकावर द्यावी, अश्या व्यक्तींना ट्रेस करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.
 
 
नागरिकांनी या संदर्भात कुठल्याही बातमी व अफवांवर विश्वास ठेऊ नये,पोलिसांकडे खात्री करावी. जिल्ह्यात व शहरामध्ये सर्वांनी शांतता ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे. काल पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.