उडीद डाळ खरेदीसाठी उद्यापर्यंत मुदतवाढ

    दिनांक  19-Jan-2018


बुलडाणा : केंद्र शासनाचे आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत २०१७-१८ दरम्यान उडीद शेतमालाची ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतमालाच्या खरेदीसाठी नाफेडने उद्यापर्यंत मुदत वाढ दिली असून सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांनी आपला शेतमाल उद्या नाफेड केंद्रावर घेऊन यावे, असे आवाहन जिल्हा मार्केंटींग अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी १३ डिसेंबर २०१७च्या अखेर १२ तालुका खरेदी – विक्री संघ अथवा चिखली जिनिंग प्रेसिंग चिखली येथे उडीदाची ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांची उडीद खरेदी जवळपास पूर्णत्वास गेलेली आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तरी देखील काही शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे एसएमएस किंवा मोबाईलद्वारे याविषयीची माहिती मिळालेली नाही. ज्या शेतकऱ्यांना या खरेदीविषयी माहिती मिळालेली नाही. अशा शेतकऱ्यांनी आपला उडीद शेतमाल नाफेडच्या खरेदी केंद्रावर उद्या संध्याकाळपर्यंत आणावा, असे मार्केटिंग अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे उरलेल्या शेतमालाची हमीभाव अंतर्गत करता येईल, असे ते म्हणाले. तसेच यानंतर आलेल्या कोणत्याही शेतमालाची कसल्याही प्रकारे खरेदी केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.