भाजप सरकारच्या काळात शेतकरी बेहाल : अजित पवार

    दिनांक  19-Jan-2018
लातूर :
'गेल्या तीन वर्षापासून या सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केले असून सरकारच्या भोंगळ कारभारामुळे आज राज्यातील शेतकरी बेहाल झाला आहे' असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर केला आहे. लातूर येथे आयोजित हल्लाबोल यात्रेदरम्यान घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.


'आज राज्यामध्ये शेतकरी या सरकारच्या कारभाराला कंटाळून आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना वीजपुरवठा देऊ असे आश्वासन देत वीज ऐवजी फक्त भरमसाठ बिलं शेतकऱ्यांच्या हाती देण्यात येत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या घरात लाईटच नाही अशा शेतकऱ्यांना देखील विजेची बिलं दिली जात आहेत. त्यामुळे लातूरमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला तर एका महिलेने आत्महत्या देखील केली आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्याच कसल्या प्रकारच हित करत आहे, हाच मोठा प्रश्न आहे' अशी टीका पवार यांनी वेळी केली.


तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या एकाही पिकाला हमीभाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. त्यातच कर्जमाफीचे आणखीन एक ढोंग उभारून शेतकऱ्यांची आणखीन फसवणूक केली जात आहे. त्यामुळे आधीच परीस्थितने हतबल झालेला शेतकरी आत्महत्या करत आहे. परंतु मुख्यमंत्री म्हणतात कर्जमाफी दिली आहे. राष्ट्रवादीने विदर्भापासून आता मराठवाड्यापर्यंत हल्लाबोल यात्रा केली आहे, पण कर्जमाफी मिळालेला एक शेतकरी आम्हाला मिळालेला नाही' असे ते यावेळी म्हणाले.