राज्यात 'फसणवीस' सरकार सत्तेवर : धनंजय मुंडे

    दिनांक  18-Jan-2018

 
बीड : राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफीचे फसवे आश्वासन दिले. इंधनाच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आश्वासनांची वचनपूर्ती न करणारे 'फसणवीस' सरकार राज्यात सत्तेवर आले आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.
 
 
 
राष्ट्रवादी हल्लाबोल आंदोलन यात्रा बीड जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी पाटोदा नगरपंचायतीच्या मैदानासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रवक्ते नवाब मलीक, राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ, विद्या चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
यावेळी अजीत पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत ते विधीमंडळात खोटे बोलतात असा आरोप केला. समृद्ध जीवन योजनेत जिल्ह्यातील अनेक गृहिणी व इतरांनी मेहनतीचे पैसे गुंतवले आहेत. मागच्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात लोकांचे पैसे परत द्यायला लावू असे सांगितले होते. मात्र आतापर्यंत कुणालाही पैसे मिळालेले नाहीत. मुख्यमंत्री विधिमंडळातसुद्धा धडधडीत खोटं बोलतात असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला.