सत्ताधाऱ्यांनी कामे न केल्यानेच मराठवाड्याचा विकास खुंटला : अजित पवार

    दिनांक  18-Jan-2018

 
 
माजलगाव : ग्रामपंचायतीमध्ये निवडून न येणारे लोक मोदी लाटेत आमदार झाले. पण सत्ताधाऱ्यांनी काहीही कामे न केल्यामुळे मराठवाड्याचा विकास खुंटला, असा आरोप विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारमधील नेतेमंडळीवर केला. माजलगाव येथे हल्लाबोल आंदोलनाच्या सभेत ते आज बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, बीडचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
हजारो कोटींचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या परदेशी पळाला. त्याच्यावर अद्याप ठोस कारवाई झाली नाही. पण इथे थोडेसे बिल बाकी असलेल्या शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. अशा सरकारला आता जनताच धडा शिकवेल, असे सांगत पवार यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.
 
 
मराठवाड्यातील पोलीस प्रशासनाला असे वाटते की फडणवीस हे कायम मुख्यमंत्री राहणार आहेत. पण ‘वक्त बदलने मे देर नही लगता... राष्ट्रवादीका भी वक्त आयेगा’ त्यामुळे पोलीस प्रशासनाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देऊ नये. आमचा संघर्ष पोलीस प्रशासनासोबत नाही, तर सरकारसोबत आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
 
 
 
 
‘बेटी पढाओ, बेटी बढाओ’, अशी जाहिरातबाजी करणार्‍या या सरकारच्या काळात मुलगी घराबाहेर असली की आई-वडिलांचा जीव टांगणीला लागतो. कारण आता कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन सत्तेत आले. सध्या राज्यात महिलांवर एवढे अत्याचार झाले आहेत की आज महाराज असते, तर या सत्ताधाऱ्यांचा कडेलोट केला असता, अशा शब्दांत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सरकारवर ताशेरे ओढले.