मुख्यमंत्री विधिमंडळात खोटं बोलतात : अजित पवार

    दिनांक  17-Jan-2018
 

 
 
पाटोदा : समृद्ध जीवन योजनेत जिल्ह्यातील अनेक गृहिणी व इतरांनी मेहनतीचे पैसे गुंतवले आहेत. मागच्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात लोकांचे पैसे परत द्यायला लावू असे सांगितले होते. मात्र आतापर्यंत कुणालाही पैसे मिळालेले नाहीत. मुख्यमंत्री विधिमंडळातसुद्धा धडधडीत खोटं बोलतात असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला.
 
 
 
 
राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात येणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी पाटोदा येथे पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी खासदार पद्मसिंह पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
पाटोदा-शिरुर-आष्टी या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे रानडुक्कर आणि हरणं मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. ज्वारी, उडीद, कापूस अशी इथली महत्त्वाची पिकं आहेत. या पिकांना हमीभाव मिळत नाही. भाजपच्या दळभद्री नेतृत्वामुळे जिल्हा बँकही डबघाईला आली असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.
 
 
 
बीड जिल्ह्यातून आठ लाख शेतकरी ऊस तोडणीसाठी जिल्ह्याबाहेर जातात. यामुळे जवळपास तीन हजार मुले दरवर्षी शिक्षणापासून वंचित राहतात. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने सरकारने महामंडळाची फक्त घोषणा केली. कामगारांच्या हाती मात्र काहीच लागलेले नसल्याचा आरोपही पवार यांनी केला.
 
 
 
 
 
भाजपची आश्वासने चित्रपटांच्या डिस्क्लेमर सारखी : धनंजय मुंडे
 
चित्रपट सुरु होण्याआधी डिस्क्लेमर येते त्याप्रमाणे भाजपची आश्वासने आहेत. वास्तवाशी त्यांचा काही संबंध नाही, ती काल्पनिक आहेत अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणू पण यांच्या राज्यात शेतकरी आपली जीवन यात्रा संपवू लागला आहे.
 
 
 
 
शेतकऱ्यांच्या शेतमालाला सरकारने भाव दिला नाही. व्यापारी आधी मोदींच्या नावाचा जप करत होते. मोदींनी नोटाबंदी केली, जीएसटी लावला. आता तर मोदी टिव्हीवर दिसले तरी व्यापारी घाबरतात, असे वक्तव्य मुंडे यांनी केले. मराठवाड्यात दुष्काळ असताना आम्ही ठिकठिकाणी चारा छावण्या लावल्या. शेतीसाठी शरद पवार यांनी भरघोस मदत या भागासाठी दिली होती. पाटोदा तालुक्यात आज एकही व्यक्ती भाजप सरकारवर खूष नाही असे मुंडे यावेळी म्हणाले.
 
 
 
 
हज सबसिडी एअर इंडियाचे नुकसान कमी करण्यासाठी : नवाब मलिक
 
भाजपा सरकार निवडणुका जिंकण्यासाठी धार्मिक-जातीय राजकारण करत असल्याचा आरोप पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. हजची सबसिडी बंद होत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो, असे वक्तव्य त्यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाने आधीच हजची सबसिडी बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. मग भाजप याचा पुनरुच्चार का करत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुळात ही सबसिडी एअर इंडियाचे नुकसान कमी करण्यासाठी हज यात्रेच्या नावावर दिली जात असल्याचे ते म्हणाले.