शैक्षणिक ‘कसर’त...

    दिनांक  17-Jan-2018   
 

 
असे म्हटले जाते की, तुम्ही शिकाल तर जगाल. ‘जगणे’ याचा इथे अर्थ केवळ शारीरिक गरजांपुरते जगणे नसून माणूस म्हणून तुमची शैक्षणिक, बौद्धिक, व्यावहारिक आणि भावनिक प्रगती यांची आपण कशी सांगड घालतो, यावर ते निर्भर करते. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा आणि एकूणच शैक्षणिक वातावरण पोषक असणे अपेक्षित. पण, अजूनही इंग्रजाळलेली भारतीय शिक्षण पद्धती केवळ पुस्तकी धडे देण्यातच धन्यता मानते, हे खरे दुर्देव. Annual Status of Education Report (ASER) 2017' अर्थात ‘असर’च्या अहवालातील काही ठळक निष्कर्षांवर एक कटाक्ष जरी टाकला तरी भारतीय शिक्षण पद्धतीच्या संकुचितपणाची आणि पुस्तकी प्राविण्याच्या फुशारकीची जाणीव होते. या अहवालानुसार, देशातील १४-१८ या वयोगटातील तब्बल ८६ टक्के विद्यार्थी हे अजूनही औपचारिक शिक्षणव्यवस्थेतच अडकलेले आहेत. याचा अर्थ, विद्यार्थी शिक्षण जरी घेत असले, शाळांमधला हजेरीपट जरी वाढता असला तरी त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वय आणि इयत्तेनुसार अजूनही वाचन, गणित सोडवणे, पैसे मोजणे, घड्याळात पाहून अचूक वेळ सांगणे यांसारख्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींशी जुळवून घेता येत नाही. त्यातही या वयोगटातील २५ टक्के विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत धड वाचनही करता येत नाही. म्हणजे, एकीकडे इंग्रजी शिक्षणाचा टक्का वाढत असला तरी दुसरीकडे मातृभाषेकडे होणारे एकूणच दुर्लक्ष निश्चितच चिंताजनक म्हणावे लागेल.
 
तसेच ‘शाळेत शिकवलेले गणित पुढे दैनंदिन आयुष्यात कुठे कामाला येते?’ असा एक (गैर)समज विद्यार्थ्यांमध्ये बरेचदा मोठ्यांकरवीच अप्रत्यक्षपणे बिंबवला जातो. परिणामी, मुलांचा कल आधीच नावडत्या वाटणार्‍या गणिताकडे केवळ उत्तीर्ण होण्यापुरते गुण मिळवण्याकडे झुकतो. अंकांची हीच ऍलर्जी आयुष्यभरही अशीच कायम राहते आणि पुढे रोजचे व्यवहार, बँकेचे व्यवहार करताना अडचणींना तोंड द्यावे लागते. ‘असर’च्या अहवालातही गणिताबद्दलची अधोरेखित केलेली हीच उदासीनता चिंतेत भर घालणारी आहे.
 

आता ‘असर’ अपेक्षित!
’असर’च्या या वार्षिक शैक्षणिक अहवालाचा उद्देश केवळ आकडेवारीपुरती माहिती उपलब्ध करण्याचा नसून त्याआधारे देशभरात चर्चा घडवून आणण्याचा आहे. कारण, एकीकडे पंतप्रधान मोदी ‘स्कील इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’सारख्या काळाच्या गरजा ओळखून अभियाने राबवित आहेत, तर दुसरीकडे शैक्षणिक पातळीवरील प्रगतीचा दर्जा सुमारच म्हणावा लागेल. कारण, आज ज्या उपजत उद्योजक वृत्तीची, कुठल्या तरी कौशल्याची अपेक्षा आपण तरुणांकडे करतोय, ती पूर्ण व्हायची असेल तर प्राथमिक शिक्षणापासून ते अगदी पदवी-पदव्युत्तर शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करावेच लागतील. बरेचदा, अमूक एका विषयामध्ये घेतलेले शिक्षण, त्याच क्षेत्रात नोकरीवर लागल्यानंतरही कामाला येत नाही, हा अनुभव आहे. त्यामुळे अगदी पहिल्या इयत्तेपासून ते अगदी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिक्षणाचा भर हा केवळ विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्यापुरता न ठेवता, त्या शिक्षणाचा भावी आयुष्यात दैनंदिन जीवनात कसा फायदा होईल, याकडे असायला हवा.
 
‘असर’च्या अहवालातील एक समाधानकारक बाब म्हणजे, या वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल, संगणक यांचा वाढता वापर अर्थात डिजिटल साक्षरता. पण, त्याचा सुयोग्य वापर कसा करावा, याचेही धडे याच वयात देणे गरजेचे आहे. तेव्हा, एकूणच भारतात ज्या वेगाने सामाजिक, डिजिटल क्रांतीचे वारे वाहत आहेत, त्याचे गतीने शैक्षणिक क्रांती झाल्यास ‘असर’चा असर दिसून येईल.
 
 
 
- विजय कुलकर्णी