गावातील शाळा टिकविण्याचा व दर्जेदार करण्याचा निर्धार

    दिनांक  16-Jan-2018
 

 
 
पालघर : ''ग्रामीण भागात आमच्या मुलांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय दुसरा पर्याय नाही. आमच्या गावातील शाळा आता कात टाकत आहेत. मुलांना चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. आमच्या गावातील शाळा डिजिटल होत आहेत. मुलांना संगणकावर शिकायला मिळत आहे.आमची मुलं विविध कार्यक्रमात व खेळात अव्वल राहत आहेत. मुलांसाठी शिक्षक मेहनत घेत आहेत. यामुळे आमच्या गावातील शाळा टिकविण्यासाठी व दर्जेदार करण्यासाठी आम्ही शाळेला व शिक्षकांना सर्वतोपरी सहकार्य करणार,'' असा निर्धार व्यवस्थापन समिती सदस्यांनी व्यक्त केला. निमित्त होते शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण कार्यशाळेचे.
 
पालघर जिल्हा परिषद आयोजित शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण नुकतेच जि.प.शाळा डोंगरीपाडा (नावझे) केंद्र पारगाव ता. पालघर येथे पार पडले. यासाठी पालघर तालुक्यातील १२ मॉडेल स्कूलची निवड करण्यात आली. त्या अंतर्गत डोंगरी पाडा शाळेत या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. नवघर, पारगाव व दहिसरतर्फे मनोर या तीन केंद्रांतील ४० शाळांमधील जवळजवळ अडीचशे व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच या तीन केंद्रातील प्रत्येक शाळेतील प्रमुख शिक्षक/सचिवांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता.
 
या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी कविता राऊत, केंद्रप्रमुख राजेंद्र संखे, प्रशिक्षण समन्वयक डी.के. संखे यांनी शाळेच्या भौतिक व गुणवत्ता विकासामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका व कर्तव्य आणि अधिकार याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी शिक्षक नितीन राऊत, दत्ता ढाकणे, अश्‍विनी सोगले यांनीही आपले विचार व्यक्त केले व शाळेची शैक्षणिक प्रगती डोळ्यासमोर ठेऊन शाळा व्यवस्थापन समितीला सर्वतोपरी सहकार्र करण्याची सर्व शिक्षकांच्या वतीने हमी दिली. या कार्यक्रमाला नवघर केंद्र प्रमुख मीनाक्षी नेमाडे, सरपंच विद्या लाबड, उपसरपंच रणजित ठाकूर तसेच पालक, ग्रामस्थ व शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.