नोटाबंदीच्या श्राद्धानंतर आता राष्ट्रवादीचे 'जागरण गोंधळ'

    दिनांक  16-Jan-2018तुळजापूर : भाजप आणि शिवसेनाच्या या फसव्या राज्य सरकारला लवकरात लवकर जाग यावी व जनतेची गाऱ्हाणी त्यांना समजावीत, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आज तुळजापुरात जागरण गोंधळ घालण्यात आले आहे. सरकारने सामान्य जनतेची फसवणूक करणे बंद करून त्याच्या विकासाकडे लक्ष्य द्यावे, असे गाऱ्हाणे या कार्यक्रमातून राष्ट्रवादीकडून देवीला घालण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि पक्षाचे इतर कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते.


येत्या २१ तारखेपासून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्हे पिंजून काढण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. यासाठी राष्ट्रवादी नेते आज तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी राष्ट्रवादी नेत्यांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांमध्ये सामान्य जनता आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. या सरकारच्या मनमानी कारभारामुळे राज्यातील सर्व जनता त्रस्त आहे. तरी देखील या सरकारला जाग येत नाही.' अशी टीका राष्ट्रवादीकडून यावेळी करण्यात आली.