खडसे असो वा मुंडे ओबीसी समाजावर नेहमी अन्याय : धनंजय मुंडे

    दिनांक  12-Jan-2018


जालना : 'ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असो वा सत्तेत वाटा देण्याचा मुद्दा असो, भाजपने नेहमी ओबीसी समाजावर अन्याय केला आहे.', असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार आणि भाजपवर केला आहे. जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे आयोजित ओबीसी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

'गोपीनाथ मुंडे असो वा एकनाथ खडसे यांनी नेहमी ओबीसी समाजाला फसवण्याचे काम केले आहे. निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन ओबीसी समाजाची मते मिळवायची आणि याबदल्यात सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यावर अन्याय करायचा हीच भाजप नीती राहिलेली आहे. ओबीसी महामंडळ हे फक्त नावालाच असून या सरकारने ओबीसी समाजासाठी काय नवीन केले ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच नव्या सरकारमध्ये साधा नवीन ओबीसी मंत्रीही सरकारतर्फे देण्यात आला नाही, असे देखील ते म्हणाले.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या कार्याची माहिती देत पवार यांनी ओबीसी समाजाला सर्वात प्रथम संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे ते म्हणाले. शरद पवार यांनी या देशात सर्वप्रथम मंडळ आयोगाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात केली व पवार यांनी आपल्या १५ वर्षातील सत्तेच्या काळात छगन भुजबळ, सुनील तटकरे, गणेश नाईक यासारख्या नेत्यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाला संधी दिली. परंतु भाजपमध्ये मात्र आज एकही ओबीसी नेता दिसत नाही, असे म्हणत. जो न्याय खडसे यांना दिला तो प्रकाश मेहता यांना का दिला नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला.