खिसे कापून भाजपचे अच्छे दिन : संग्राम कोते पाटील

    दिनांक  10-Jan-2018


जालना : 'गेल्या तीन वर्षांच्या काळामध्ये भाजप सरकारने राज्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना फक्त लुटण्याचे काम केला आहे. त्यामुळे सामन्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे खिसे कापून अच्छे दिन आणणार का ?' अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी भाजपवर केली आहे. परतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते.

'गेल्या तीन वर्षात भाजप सरकारने केलेल्या मनमानी कारभारामुळे राज्यातील जनता जनता त्रस्त झाली आहे. सरकाच्या बिनकामी धोरणामुळे सामान्य शेतकरी त्रस्त झाला आहे. बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप कोते यांनी केला. आमदार टोपे यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध करीत सर्व स्तरांवरील नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे त्यांनी म्हटले.

तसेच सरकारच्या याच भावनाशून्य कारभाराविरोधात राष्ट्रवादी पुन्हा एकदा 'हल्लाबोल' यात्रेची सुरुवात करणार आहे, असे त्यांनी सांगितले. येत्या २१ तारखेपासून मराठवाड्यात या हल्लाबोल यात्रेला सुरुवात होणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी यामध्ये मोठ्या संख्याने सामील व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.