विदेशात आश्‍वासनांचा तो रिकामा ‘हात’

    दिनांक  10-Jan-2018   
 

 
 
 
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या सौदी अरबच्या दौर्‍यावर आहेत. काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल यांचा म्हणा तसा हा पहिलाच अधिकृत दौरा. म्हणजे अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी ‘गेला राहुल कुणीकडे...’ अशी स्थिती होती, पण चला परिस्थिती पालटतेय म्हणायचं. यापूर्वीही राहुल गांधींनी असाच अमेरिका दौरा केला होता आणि तिथेही मोदी सरकारवर तोंडसुख घेतले होते. आता आपल्या सौदी अरबच्या दौर्‍यातही मोदी सरकारवर नाहक टीका करून राहुलने आपल्या अकलेचे तारे तोडले नसते तरच नवल.
 
बहारिनमध्ये तेथील भारतीयांना संबोधित करताना राहुल गांधींनी मोदी सरकार व त्यांच्या धोरणावर चौफेर टीका केली. विरोधी पक्षाच्या अध्यक्षांकडून टीका होणे स्वाभाविक. त्यात तसे काही गैर नाही, पण टीका करताना, आपण नेमकी कोणत्या मुद्द्यांवर करतोय, याचे भान ठेवणेही तितकेच आवश्यक आणि त्यातही पंतप्रधानांबद्दल देशाबाहेर बोलताना ती व्यक्ती कितीही मोठी शत्रू असेल, रुचत नसेल तरी शेवटी आपल्याच देशाची पंतप्रधान आहे, हे विसरून कसे चालेल?
 
बहारिनमधील भारतीयांना संबोधित करताना राहुल यांनी भारतातील परिस्थिती अतिशय बिकट असल्याचा आव आणत सांगितले. सत्तारुढ भाजपचे सरकार ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब करत असून जातीपातींमध्ये द्वेष पेरत असल्याचा आरोप राहुल गांधींनी अगदी छातीठोकपणे केला. निराधार आणि निरर्थकपणे असे सांगून भाजप बेरोजगार तरुण भारतीयांना जातीच्या या लढाईत खेचत असल्याचा विचित्र दावाही त्यांनी केला. हे कमी होते की काय म्हणून, ‘‘मी तुमच्यासाठी इथे आलो आहे. तुम्ही देशासाठी महत्त्वाचे आहेत. तेव्हा, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल तरी तुमच्यात आणि आपल्या देशात दुवा म्हणून मी काम करीन,’’ असे काहीसे जणू मत मागण्यासाठीचे गुळगुळीत भाषण राहुल यांनी ठोकले. पण, प्रश्‍न एकच, इतका जर राहुल गांधींना सौदी अरब किंवा जगाच्या कानाकोपर्‍यात बसलेल्या भारतीयांचा पुळका असेल तर सौदी अरबमधील गरीब, बेरोजगार, कामानिमित्त आलेल्या पण मालकांच्या मुजोरीमुळे अडकून पडलेल्या भारतीयांविषयी एक चकार शब्द का नाही काढला? तेथील भारतीयांच्या परिस्थितीविषयी त्यांनी यापूर्वी कधी आवाज उठविल्याचेही ऐकीवात नाही की सुषमा स्वराज यांच्याप्रमाणे एखादे ट्विट करून राहुल गांधींकडे कोणा विदेशातील भारतीयाने मदतीचा ‘हात’ मागितल्याचेही आठवत नाही. तेव्हा, राहुल गांधींनी अशी पोकळ आश्‍वासने देऊन किमान विदेशातील भारतीयांची तरी दिशाभूल करू नये.
 
 
- विजय कुलकर्णी