पालघर जिल्ह्यात बालमृत्यूच्या संख्येत घट- डॉ.सावंत

    दिनांक  01-Jan-2018
 

 
 
 
मुंबई : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाड्यात नवजात शिशु अतिदक्षता कक्षांची संख्या वाढविण्यात येणार आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे पालघर जिल्ह्यातील बालमृत्यूंच्या संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज दिली.
 
 
पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी जून महिन्यापासून या भागाचा दर पंधरा दिवसांनी दौरा करुन वाडे, पाड्यांना, आरोग्य उपकेंद्रांना अचानक भेटी दिल्या आहेत. २०१७ वर्षाच्या शेवटच्या दिवशी अचानक जव्हार, मोखाड्यातील उपकेंद्रांना भेटी दिल्या आहेत. या ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये नवजात शिशु अतिदक्षता कक्षांची संख्या वाढविण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीची (सीएसआर) यासाठी सहाय्य घेतले जाणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
 
 
पालघर जिल्ह्यातील बालमृत्यूंची आकडेवारी पाहिली असता त्यात कुपोषणाव्यतिरीक्त अन्य विविध कारणांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये अपघात, सर्पदंश यांचा समावेश आहे. यावर्षी नोव्हेंबर अखेर बालमृत्यूची संख्या ३२३ असून ही संख्या २०१४-१५ मध्ये ६२६, २०१५-१६ मध्ये ५६५, २०१६-१७ मध्ये ५५७ एवढी होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेर बालमृत्यूची संख्या ३८४ होती ती यावर्षी ३२० म्हणजे जवळपास ५० अंकांनी कमी झाली आहे. नोव्हेंबर २०१७ अखेर कुपोषित बालकांची संख्या ४५६४ असून त्यात तीव्र कुपोषित बालकांची (सॅम) संख्या ४९९ तर मध्यम कुपोष‍ित बालकांची संख्या (मॅम) ४०६५ इतकी आहे. विशेष म्हणजे अतिसाराने मृत्यू झालेल्या बालकांची संख्या शून्य आहे. नोव्हेबर अखेर पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये (एनआरसी) ५७७ कुपोषित बालकांवर उपचार करण्यात आले. तर बाल उपचार केंद्रांमध्ये (सीटीसी) ४५६ बालकांवर उपचार करण्यात आले.
 
 
दरवर्षी ऑक्टोबर ते मे या काळात जव्हार, मोखाडा, विक्रमगड, पालघर या भागातून सुमारे ४२ हजार कुटुंब रोजगारासाठी स्थलांतर करतात. त्यामुळे ज्या भागात या कुटुंबांचे स्थलांतर होते. तेथे स्थलांतरीत बालकांची काळजी घेण्यासाठी त्या-त्या भागातील आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात. मात्र स्थलांतरामुळे बालकांवर सुरू असलेल्या उपचाराबाबत संनियंत्रण करणे काहीवेळेस शक्य होत नाही. त्यामुळे ह्या कुटुंबांना जर स्थानिक भागातच रोजगार मिळाला तर पालघर मधील कुपोषणाचे प्रमाणात अजून घट होईल. माहे मे ते ऑक्टोबर या काळात स्थलांतरीत कुटुंबियांची आरोग्य तपासणी, पुनरागमन शिबीर याबाबत यावर्षाचे नियोजन करण्यासाठी मंगळवार दि. २ जानेवारी रोजी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.