कर्मभूमीने नाकारले तरी जन्मगावाने मला स्वीकारले - पंकजा मुंडे

    दिनांक  30-Sep-2017


बीड : वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडावर यावर्षी बघावी अशी गर्दी झाली नाही. दसऱ्याच्या मुहूर्तावर हजारोंचा समुह भगवान गडावर दरवर्षी लोटतो. मात्र यावर्षी पंकजा मुंडेंना भगवानगडावर दसरा मेळावा घ्यायला नारायण शास्त्रींनी परवानगी नाकारल्याने भगवान बाबांच्या जन्मगावी सावरगावला मुंडे यांनी दसरा मेळावा घेतला. त्यावेळी बोलताना त्यांनी इतरांच्या दसरा मेळाव्याला कुठेही विरोध नसतो. मग माझ्या बाबांप्रमाणे मला भगवानगडावर दसरा मेळावा घ्यायला विरोध का होतो असा प्रश्न उपस्थित केला. मी काय आतंकवादी आहे का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुढे त्या म्हणाल्या की, मला कोणताही वाद नको होता आणि मला कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता म्हणून आजचा मेळावा सावरगावात घेण्याचा निर्णय घेतला. येत्या काळात भगवानगड हा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. 

भगवान बाबांचा आशीर्वाद माझ्या बाबांना मिळाला होता. त्यामुळे ते यशस्वी झाले अशी माझी भावना आहे. त्यांचे कष्ट तर महत्त्वाचे आहेतच. पण भगवान बाबांच्या आशीर्वादाशिवाय उभे राहणे अवघड आहे. म्हणूनच भगवान बाबांचा अवमान मला करायचा नव्हता यासाठी मी नमते घेतले. आशीर्वाद घेण्यासाठी आज गडावर जाता आले नसले तरी त्यांच्या जन्मभूमीची माती कपाळाला लावून मी आज दसऱ्याच्या दिवशी सामान्य लोकांची सेवा करण्याची शपथ घेते.

Embeded Object

माझे गडावर जाणे रोखले असले तरी भगवान बाबांच्या भक्तांच्या सुरक्षेसाठी आज अडीच हजार पोलीस फाटा गडावर तैनात आहे असे सांगत महंत नारायण शास्त्री यांनी घेतलेल्या निर्णयावर हास्यव्यंग व्यक्त केले.