शेतकऱ्यांनी गटशेतीसाठी पुढाकार घ्यावा

    दिनांक  03-Sep-2017बुलडाणा - शेती हा तोट्याचा धंदा आहे, असे अनेकांकडून म्हटले जाते. परंतु जर समुहाने व एकत्रितपणे शेती केल्यास, शेती हा व्यवसाय कायमच नफ्याचा व्यवसाय ठरतो. त्यामुळे गावातील २०-२५ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुभाष बोंदाडे यांनी आज केले. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा यांच्यावतीने गणेशोत्सव काळात 'संवादपर्व' या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतगर्त नांदुरा तालुक्यातील विटाळी या गावात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.


राज्य शासन, केंद्र सरकार आणि नाबार्डकडून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गट शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी गावातील २५ ते ४५ या वयोगटातील २५ शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन गटशेती करावी, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी लागणारे सर्व गोष्टी सरकारकडून पुरवल्या जातील. नागरिकांना त्यांच्या आवडीच्या विषयात १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण मोफत देण्यात येईल. या प्रशिक्षणातून ग्रामस्थ गावातच उद्योग निर्माण करू शकतील. तसेच १०० शंभर एकरमध्ये शेती आणि संबंधित व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून १ कोटी रुपयांचे अनुदान देखील देण्यात येणार आहे, असे माहिती त्यांनी यावेळी दिली.


नागरिकांनी नाबार्डच्या शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय आदींच्या योजनांचा लाभ घेऊन सरकारच्या अनुदान मिळवून स्वतःचे व्यवसाय सुरु करावेत. या विविध योजनांमधून प्रशिक्षण घेऊन तकरी उत्पादक कंपनीसाठी नोंदणी करून प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.