कर्जमाफी अर्जांची माहिती बँकांनी त्वरित सादर करावी - पालकमंत्री फुंडकर

    दिनांक  29-Sep-2017

बुलडाणा - राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेमार्फत कर्जमाफीसाठी भरण्यात आलेल्या अर्जांची छाननी करून त्या संबंधीची माहिती अजूनही सरकारकडे पाठवण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व बँकांनी आपल्याकडे जमा झालेल्या अर्जांची तातडीने छाननी करून पात्र शेतकऱ्यांची संख्या व माहिती सरकारला पाठवा, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.


राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान या योजनेतंर्गत अर्ज ऑनलाईन भरण्यात आले. मात्र भरलेल्या अर्जांची छाननी करून अर्जांची माहिती शासनाकडे पाठविण्यात आलेली नाही. तरी राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण व जिल्हा बँकेने आपल्याकडील एकूण कर्जदार शेतकरी खातेदार संख्या, पात्र कर्जदार शेतकरी खातेदार संख्या व माहिती पाठविण्यात आलेल्या कर्जदार शेतकरी संख्या यांची ६४ कॉलमच्या तक्त्यातील तपशीलवार माहिती त्वरित पाठवावी, अशा सूचना पालकमंत्री फुंडकर यांनी केल्या.


कर्जमाफी योजनेतील प्राप्त अर्जांच्या याद्यांचे वाचन चावडीवर करण्याचे निर्देशीत करीत पालकमंत्री म्हणाले, गावागावात कर्जमाफी अर्जांचे वाचन करण्यात यावे. ज्या गावांमध्ये निवडणूका आहेत, त्या गावांमध्ये निवडणूका संपल्यानंतर वाचन करावे. यावेळी आधार क्रमांक संलग्न नसलेल्या कर्जदार बँक खातेदारांची माहिती देण्यात यावी. आधार कार्ड जमा करण्यात यावेत. तसेच सदर कर्जखात्याशी आधार क्रमांक संलग्न करण्यात यावा, असे ते म्हणाले.


पालकमंत्री पुढे म्हणाले, कर्जमाफीचा सर्वात जास्त लाभ बँकानाच होणार आहे. बँकांची कर्जवसुलीतून सुटका होणार आहे. त्यामुळे बँकांनी या कार्यवाहीकडे प्राधान्याचे लक्ष द्यावे. येत्या ४ तारखेपर्यंत ही संपूर्ण माहिती पाठविण्यात यावी. माहिती न पाठविल्यास पात्र कर्जदार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहील्यास त्याची जबाबदारी बँकांची राहणार आहे. तरी बँकांनी कुठलाही हलगर्जीपणा न दाखविता तातडीने हे काम पूर्ण करावे. तसेच कुठल्याही शेतकऱ्यांचे बचत खात्यातील पैसे कर्ज खात्यात वळते करू नये. असा शेतकरी कर्जमाफीस पात्र न ठरल्यास बँकांनी जबाबदारी घ्यावी.