मतदारांनी यादीतील नावे तपासून पहावीत - जिल्हाधिकारी

    दिनांक  28-Sep-2017

जिल्ह्यात १९ लाख ११ हजार १२३ मतदारसंख्या

बुलडाणा - राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील मतदार यादीतील नावांची नव्याने निश्चिती करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मतदारांनी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आपआपल्या नावाची निश्चिती तातडीने करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. तसेच यासाठी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी देखील प्रयत्न करावेत, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.


जिल्ह्यात १ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नवीन मतदारांनी चांगल्याप्रकारे प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५ हजार १२३ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात आताच्या स्थितीला एकूण मतदारसंख्या १९ लाख ११ हजार १२३ मतदारसंख्या आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे एकच नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्यास मतदारांनी एक नाव त्वरित वगळावे. एकाच ठिकाणी नाव ठेवावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.


मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असणे हा गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून दोन ठिकाणी नाव असल्यास एकच नाव ठेवावे. त्यासाठी प्रारूप मतदार यादी ३ ऑक्टोंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, चूक दुरूस्त करणे यासाठी विशेष मोहिमांचेसुद्धा आयोजन करण्यात येणार आहे.