जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत उद्योजकांशी चर्चा

    दिनांक  28-Sep-2017

 

परभणी : परभणी जिल्हयातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योग घटकांच्या प्रश्नांविषयी जिल्हा उद्योग मित्र समिती व जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात काल झाली. बैठकीच्या प्रारंभी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गौतम नाडे यांनी मागील बैठकीच्या इतिवृत्तावरील कार्यवाहीची माहिती सांगितली. या बैठकीस उद्योग विषयक संबंधित विभागाचे अधिकारी आणि औद्योगिक संघटनाचे पदाधिकारी व उद्योजक उपस्थित होते. महापालिका आयुक्त राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

 


परभणी औद्योगिक क्षेत्राकरीता वाढीव क्षेत्र म्हणून मौजे बाभळगाव येथील २६४ हेक्टर जमिनीची संयुक्त मोजणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केली असून भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी अहवाल प्राप्त होताच भूसंपादनाची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच औद्योगिक क्षेत्रात पोलिस चौकीची मागणी लक्षात घेता पोलिस अधिक्षक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून कार्यवाही करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. वाढीव पाणी पट्टी दराबाबत प्रकरण न्याय प्रविष्ठ झाल्याचे सांगून महानगरपालिकेशी या संदर्भात चर्चा करण्यात यावी अशी सुचना करुन जिल्हाधिकारी यांनी उद्योजकांशी त्यांच्या प्रश्ना विषयी सविस्तर चर्चा केली. सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गतच्या शिल्लक अनुदानाबाबतचा प्रश्न राज्यस्तरीय उद्योगमित्र समितीला कळविण्याचे ठरले. परभणी येथील क्लस्टर उद्योगाविषयी चर्चा झाली. जीएसटी संदर्भातही उद्योजकांनी यावेळी अडचणी सांगितल्या उद्योग घटकांना अखंड विजपुरवठयाची गरज प्रतिपादन करण्यात आली त्यानुसार महावितरणकडे ही बाब निदर्शनास आणून देण्यात यावी अशी सुचना केली.

 


यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या कामकाजाचा आढावा सादर करण्यात आला यावेळी जिल्हास्तरीय स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य समितीची आणि जिल्हा आजारी उद्योग पूनर्वसन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रामुख्याने उद्योग संघटनांचे पदाधिकारी रामेश्वर राठी, निलेश बिनायके, प्रमोद वाकोडकर, राजेंद्र पोखर्णा, पी.एम.परभणीकर, अमित कोटेचा तसेच उद्योग विभाग, महावितरण, समाज कल्याण, इत्यादी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.