जिल्ह्यात एक तारखेला भरणार 'ज्येष्ठ नागरिक मेळावा'

    दिनांक  27-Sep-2017बुलडाणा : 'जागतिक नागरिक दिना'निमित्त येत्या १ ऑक्टोंबरला शहरात ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील कायदे, शासनाच्या विविध येाजना यांची माहिती ज्येष्ठ नागरिकांना व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी दिली आहे. येत्या १ तारखेला सकाळी ११ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे हा कार्यक्रम होणार असून शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.


या मेळाव्यात आई, वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ, कल्याणासाठी अधिनियम २००७ व या अधिनियमाच्या अनुषंगाने २०१० मध्ये नव्याने पारीत केलेले नियम या विषयी सर्व माहिती यावेळी देण्यात येणार आहे. याच बरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात मातोश्री वृद्धाश्रम व सर्वसाधारण वृद्धाश्रम योजना, राज्याचे ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या तरतुदी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सहाय्य विभागाच्या योजना आदींची देखील माहिती देण्यात येणार आहे. तरी ज्येष्ठ नागरिकांनी मेळाव्याला उपस्थित राहून योजनांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन मेरत यांनी केले आहे.