#शक्तीपूजन - विजयोत्सव

    दिनांक  27-Sep-2017   


 

६ व्या शतकापासून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र भागात चालुक्यांचे राज्य होते. हे राजे देवीचे, शक्तीचे उपासक होते. बदामीची बनशंकरी, ऐहोळचे दुर्गा मंदिर आणि त्यांनी बांधलेली इतर अनेक मंदिरे पाहायला मिळतात. इ.स. ६२५ मध्ये, चालुक्य राजा पुलकेशीन दुसरा, याने वारंगळ येथे भद्रकालीचे मंदिर बांधले होते. अष्टभुजांमध्ये शस्त्र धारण करणारी भद्रकाली हे दुर्गेचे उग्र रूप आहे.

 

चालुक्यांच्या नंतर, वारंगळमध्ये काकतीय राजांची सत्ता आली. या राजांची कुलदेवता भद्रकाली देवी होती. वारंगळमध्ये नवरात्र आणि दसरा हा भद्रकालीच्या उपासनेचा मोठा उत्सव होता. भद्रकालीच्या मंदिरात आजही या उत्सवाला हजारो लोक येतात.


काकतीय राजा प्रतापरुद्र दुसरा, राज्यावर असतांना, १३०८ मध्ये, मलिक कफुरने आक्रमण केले. प्रतापरुद्रला बंदिवान करून दिल्लीला नेत असतांना तो मृत्यू पावला आणि काकतीयांचे राज्य संपुष्टात आले.


इस्लामी आक्रमणाने झालेला संहार शृंगेरी मठाचे आचार्य विद्यारण्य स्वामींनी पहिला होता. या भूमीला उत्तम शासनकर्ता लाभावा यासाठी ते तळमळत होते. योगायोगाने काकतीय सरदार, दोघे बंधू – हरिहर आणि बुक्काराय यांची आणि विद्यारण्य स्वामींची भेट घडली. या सोनेरी क्षणी विजयनगर साम्राज्याचे बीज रोवले गेले. १३३६ मध्ये हरिहर आणि बुक्काने विद्यारण्य स्वामींच्या मदतीने विजयनगरचे राज्य वसवले. विद्यारण्य स्वामींनी राजांच्या तीन पिढ्यांना मार्गदर्शन करून एक आदर्श साम्राज्य निर्माण केले.


विजयनगरच्या वैभवशाली नगरात, नवरात्र उत्सव आणि दसऱ्याची मिरवणूक मोठ्या दिमाखात साजरी केली जात असे. १५ व्या शतकाच्या सुरवातीला बांधलेल्या हजार राम मंदिरावर दसऱ्याच्या मिरवणुकीची शिल्पे पाहायला मिळतात.


१५०९ मध्ये कृष्णदेवराय विजयनगरचा सम्राट झाला. उदयगिरीच्या राजावर विजय मिळवल्यावर, कृष्णदेवरायाने “महानवमी चौथरा” बांधला. कृष्णदेवराय या चौथऱ्यावरून दसऱ्याची मिरवणूक पाहत असे. ४० फूट उंच, महानवमी चौथऱ्यावर केलेले शिल्पकाम राष्ट्राच्या संपत्तीची ग्वाही देते. त्यावर हत्ती, घोडे, योद्धे, पायदळ यांची शिल्प आहेत. शिकारीच्या खेळांची चित्रे आणि नर्तिका व वादकांची शिल्पं आहेत. अरेबिया व इतर देशातून आलेल्या व्यापाऱ्यांची चित्रे आहेत.


दसऱ्याचा उत्सव ही विजनगरीची शान होती. आजूबाजूच्या गावातून, खेड्यातून खूप लोक विजयनगरला या उत्सवासाठी येत असत. नवरात्रीचे नऊ दिवस खेळांच्या स्पर्धा, नृत्य – गायनाचे कार्यक्रम, नृत्य नाटके, कथाकथन, कठपुतलीचे खेळ, भजनाचे कार्यक्रम आदींनी भरलेले असत. उत्सवाला आलेले लोक, इथल्या बाजारांतून सोन्याचांदीचे दागिने, कपडे, मसाले, धान्य, खेळणी आदि गोष्टींची खरेदी करत असत. या उत्सवासाठी राज्यातील आणि परराज्यातीलच नाही तर परदेशातील लोक सुद्धा येत असत.


दसऱ्याच्या दिवशी, राजा चामुंडेश्वरीची म्हणजेच दुर्गेची पूजा करत असे. होमहवन, दानधर्म करत असे. राजा चौथऱ्यावर स्थानापन्न झाल्यावर सैन्याच्या कवायती, तिरंदाजी स्पर्धा, तलवारबाजी, मल्लयुद्ध स्पर्धा, हत्ती – घोड्यांची मिरवणूक, विजयी स्पर्धकांना बक्षीसे असे कार्यक्रम होत असत.


१५६५ मध्ये, आजूबाजूच्या राज्यातील बहामनी सरदार - आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, बिदरशाह आणि इमादशाह या सर्वांनी मिळून विजयनगरवर हल्ला केला. विजयनगरचे समृद्ध शहर ५ राज्याच्या सैन्याने लुटले, तोडले आणि जाळले. ६ महिन्यांनी विजयनगर मध्ये, पूर्वीच्या भव्य शहराचे, दिमाखदार ऐश्वर्याचे केवळ अवशेष उरले.


काही काळ या वंशातील राजांनी वेल्लोर मधून राज्य केले. विजयनगरच्या अधिपत्याखाली असलेले मैसूर, तंजावर, मदुराई इत्यादी राज्ये स्वतंत्र झाली. ही सर्व राज्ये विजयनगरच्या तालमीत तयार तयार झाली होती.

 


PC: Arul Prasad

 

मैसूरच्या वाडियार राजांनी विजयनगर प्रमाणे राज्यकारभार चालू ठेवला. आणि विजयनगरच्या दसऱ्या सारखाच मैसूरचा दसरा सुरु झाला. नवरात्रोत्सवात मैसूरच्या राजवाड्यावर रोषणाई केली जाते. या दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असते. गायन, वादन, नृत्य, नाटक यांची रेलचेल असते. कुस्तीच्या स्पर्धा, बाहुलीचा वेश धारण करून नृत्य आदि कार्यक्रम होतात. वाडियार राजांचे वंशज चामुंडेश्वरी देवीची पूजा करतात. त्या नंतर हत्तीवरून, सोन्याच्या अंबारीत बसवून, चामुंडेश्वरी देवीच्या मिरवणूकीने नवरात्र उत्सवाची सांगता होते.


महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र मधील चालुक्य, काकतीय आदि राजांप्रमाणेच, नंतर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची कुलदेवता सुद्धा तुळजापूरची भवानी माता होती. त्याच प्रमाणे राजस्थानातील रजपुतांची कुलदेवता सुद्धा दुर्गा देवी होती. दुर्गा माता ही शक्तीची, युद्धाची, राष्ट्राचे रक्षण करणारी, आणि प्रजेचा प्रतिपाळ करणारी देवता असल्याने, वंदे मातरम् मध्ये अवतरते -


त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी,
नमामि त्वाम्, नमामि कमलाम्
अमलां अतुलाम्, सुजलां सुफलाम्
मातरम्, वंदे मातरम् ||

 

- दिपाली पाटवदकर