पिकांचे नुकसान झाल्यास ४८ तासांच्या आत कळवा

    दिनांक  26-Sep-2017


पिका विमा योजनेसंबंधी नवीन घोषणा

बुलढाणा : पिकांचे संरक्षण तसेच शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या पिका विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्याच ४८ तासांच्या आत विमा कंपनीला या विषयी माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासाठी प्रशासनकडून एक टोल फ्री क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे.


शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पिकाच्या आर्थिक नुकसानीसाठी विम्याचे कवच प्रदान केले आहे. या खरीप हंगामातही योजनेच्या माध्यमातून सहभागी शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची मदत मिळणार आहे. सद्य जिल्ह्यात उडीद पिकाची काढणी सुरु आहे. काढणीपश्चात पिकांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संबंधी काळजी घ्यावी. वैयक्तिक स्तरावर पिकांचे नुकसान झाले असल्यास अशा शेतकऱ्यांनी ४८ तासाच्या आत विमा कंपनीला कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासाठी विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००१०३००६१ उपलब्ध करून देण्यात आला आहे.


त्याचप्रमाणे संबंधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे विहीत नमुन्यातील पिक सुचना अर्ज शेतकऱ्यांनी भरून द्यावे असे देखील प्रशासनाने सांगितले आहे. व तातडीने या विषयी अर्ज भरून विमा कंपनीला कळवावे. यानंतर १४ दिवसांच्या आत संबंधित शेतकऱ्याला त्याची नुकसानभरपाई मिळेल, असे देखील प्रशासानाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.