‘ममताबानो’ ला फटकार

    दिनांक  22-Sep-2017   
 

 
 
‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही,’ अशी एक मराठीत प्रसिद्ध म्हण आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या खोड्या पाहता त्यांना ती तंतोतंत लागू पडते. कारण, ममतांच्या कारवाया अशा काही आहेत की, न्यायालयाला त्यात वारंवार हस्तक्षेप करून त्यांना चपराक मारावीच लागते. आताही मुस्लिमांचे दाढी कुरवाळू राजकारण करणार्‍या ममतांचे थोबाड काल कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने चांगलेच फोडले. गुरुवारपासून संपूर्ण देशभरात नवरात्रीला अगदी उत्साहाने सुरुवात झाली. प. बंगालमध्ये तर दुर्गापूजा हा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. उत्सव काळानंतर म्हणजेच नऊ दिवसांनी घरोघरी आणि गावागावात, शहराशहरात, चौकाचौकात, उत्सव मंडळात विराजमान झालेल्या दुर्गामूर्तींचे विसर्जन केले जाते. जे विजयादशमी आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी होते. यंदा मात्र विजयादशमीच्या दुसर्‍या दिवशी मुस्लीमधर्मीयांचा मोहरम सण आला. त्यामुळे ममता बॅनर्जींना मुस्लिमांच्या मतपेढीला गोंजारण्याची आणि हिंदूंच्या धार्मिक भावनेला दुखावण्याची संधी प्राप्त झाली. ममता सरकारने मग आपली मतपेढी शाबूत ठेवण्यासाठी मुस्लीम लांगुलचालनाचा डाव खेळत लाखो हिंदूंच्या श्रद्धेला नख लावायचा प्रकार केला. आपण सत्तेत आहोत, आपल्यामागे आमदारांचे पाठबळ आहे आणि म्हणून त्या पाशवी ताकदीच्या जोरावर आपण कालचक्रदेखील बदलू शकतो, असा अहंकार ममतांच्या डोक्यात गेला आणि त्यांनी मोहरमच्या दिवशी दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीवर बंदी घालण्याचा फतवा काढला. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि न्यायालयाने या फतव्याला थेट केराची टोपली दाखवली. तुमच्याकडे अधिकार आहेत, म्हणून तुम्ही त्याचा अनिर्बंध वापर करू शकत नाही. तुम्ही दिनदर्शिका बदलू शकत नाहीत. तुम्हाला दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणूक आणि मोहरम-ताजिया मिरवणूक या दोन्ही कार्यक्रमांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावीच लागेल, अशा शब्दांत न्यायालयाने ममतांना फटकारले. परंतु, न्यायालयाच्या आदेशाने आपण काढलेल्या फतव्यातली हवाच निघून गेल्याचे पाहून ममतांनी पुन्हा एकदा थयथयाटाला सुरुवात केली. आपण एका राज्याच्या मुख्यमंत्री आहोत, हे विसरून त्या बरळल्या की, ‘‘कोणी माझा गळा कापला तरी मी काय करावे हे मला सांगू शकत नाही.’’ यातून ममतांचा अहंकारी आणि आक्रस्ताळा स्वभाव तर दिसतोच, पण आपण विशिष्ट समाजाच्या मतांपायी कोणत्या थराला जाऊ शकतो, हेही त्यांनी दाखवून दिले. बॅनर्जींना काही लोक ‘ममताबानो’ असेही म्हणतात. ममता बॅनर्जींच्या अशा भूमिकेमुळे त्या स्वतःच हे नाव सिद्ध करून दाखविण्यात आघाडीवर असल्याचे दिसते, एवढे मात्र खरे!
 
 
मुस्लीम ‘ममते’ ची मिनार
 
ममता बॅनर्जींना असलेला मुस्लिमांचा पुळका सर्वश्रुत आहे. ममतांचे सरकार प. बंगालमध्ये सत्तेवर आल्यापासून त्यांनी नेहमीच मुस्लीमअनुनय करण्याचा पवित्रा घेतला, मग त्यासाठी बहुसंख्य हिंदूंच्या भावनांना ठेच लागली तरी त्यांनी त्याचा कधी विचार केला नाही. गेल्या वर्षी देखील ममता सरकारने दुर्गापूजेनंतर विसर्जन मिरवणुकीवर मोहरममुळे बंदी घालण्याचा आगाऊपणा केला होता. तेव्हाही न्यायालयाने ममतांना दणका देत ती बंदी उठविण्याचा आदेश दिला होता. त्याचबरोबर ममता सरकार मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात आघाडीवर असल्याचे ताशेरेही ओढले होते. मागच्या वर्षी तोंडावर आपटल्यानंतरही ममता शहाण्या झाल्या नाहीत आणि त्यांनी याहीवर्षी तोच शहाजोगपणा केला आणि पुन्हा आपल्याच हाताने आपल्याच निर्णयाचा कचरा करून घेतला. पण एवढे होऊनही सुधारतील त्या ममता कसल्या? हिंदूंचा द्वेष आणि मुस्लिमांचा अनुनय केल्याशिवाय त्यांचे पानही हालत नाही, अशा ममतांनी मग केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, संघ आणि भाजपवर तोंडसुख घेतले. मात्र, आपल्या पायाखाली काय जळत आहे, ते पाहण्याची हुशारी काही त्यांना आली नाही. बंगालमध्ये मुस्लीम समाजातील धर्मांधांनी काहीही बोलावे आणि त्यांच्यावर काही कारवाई होऊ नये, असे सरकारचे धोरणच! बशिरहाट, मालदा, कालीचक आदी ठिकाणी धर्मांध मुस्लिमांनी दंगलीदेखील घडवून आणल्या. मात्र, त्याचे काहीही सोयरसुतक नसलेल्या ममता त्याच्याविरोधात काही बोलल्या नाही की, दंगलखोरांविरोधात त्यांनी काही कारवाईही केली नाही. उलट या घटनांना संघ, भाजप आणि हिंदूच जबाबदार असल्याचा जावई शोधही त्यांनी लावला. मात्र, न्यायालयाने ममतांचा जावईशोध नाकारत बॅनर्जी सरकारच मिरवणुकीचा मुद्दा पुढे करत दोन समुदायांत तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे सुनावले. ममता सरकार सत्तेवर येण्याआधीही राज्यात दुर्गापूजा होतच असे, परंतु त्यावेळी कधी राज्यात दंगली झाल्याचे दिसले नाही. अगदी मोहरम आणि नवरात्र एकत्र असले तरी कधी राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाली नाही. मग दंगली होतील, असा आधीच कांगावा करत दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीवर बंदी घालण्याचे काय कारण असावे? पं. बंगालमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या निवडणुकांचा याच्याशी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपचा होत असलेला उत्कर्ष पाहवत नाही आणि हातात काही चिरंतन, शाश्वत कार्य करण्यासारखे नसल्याने ममता अशा प्रकारे द्वेष आणि धर्मांध राजकारण करून आपल्या राजकारणाची खिचडी शिजवत असाव्यात, हेच यामागचे कारण असावे. 
 
- महेश पुराणिक