‘फायर’ गेली, उरला फक्त ‘ब्रँड’...

    दिनांक  22-Sep-2017   
 


 
 
सध्या राणे केवळ त्यांच्या मुलांच्या राजकीय भविष्याची तरतूद करण्याच्याच प्रयत्नात आहेत, अशाही चर्चा आहेत. पण या गोष्टी खर्‍या असल्यास एकेकाळी (आणि आजही) ’आपण कुणाला घाबरत नै,’ अशा गुर्मीत वावरणार्‍या ‘फायरब्रँड’ नारायण राणेंवर, ‘फायर’ गेली आता केवळ ‘ब्रँड’ टिकवण्यासाठी धडपड करण्याची वेळ आली असल्याचं दुर्दैवाने म्हणावं लागेल.
 
कोणत्याही व्यक्तीने आपल्याला समाजाकडून दिल्या गेलेल्या विशेषणांच्या किती आहारी जायचं, याला काही मर्यादा असतात. राजकीय लिखाण करताना पत्रकार, विश्लेषक-अभ्यासक इत्यादी मंडळी नेत्यांबाबत काही विशेषणं, उपाधींचा सर्रास वापर करतात आणि मग त्यातील काहींचा ट्रेंडच बनून जातो. उदा. मुरब्बी नेता, धूर्त, चाणाक्ष नेता, आक्रमक नेता वगैरे वगैरे. कालांतराने ही विशेषणं इतकी लोकप्रिय होतात की, ते नेतेही त्यांना वस्तुस्थिती मानू लागतात. काहीजण लबाडीला ‘मुरब्बीपणा’ समजतात, काही बेरकीपणाला ‘चाणाक्षपणा’ समजतात, तर काहीजण आक्रस्ताळेपणालाच ‘आक्रमकपणा’ समजू लागतात! अशातून मग हळूहळू हे नेतेही स्वतःला नकळत वस्तुस्थितीपासून दूर नेतात, स्वतःच्या मनातील त्या प्रतिमा जपण्यासाठीच वाट्टेल ते करू लागतात आणि मग होत्याचं नव्हतं होऊन बसतं. २००५ मध्ये थाटामाटात शिवसेनेला ’जय महाराष्ट्र’ म्हणत कॉंग्रेस पक्षाची वाट धरत नारायण राणेंनी महाराष्ट्रात त्यावेळचा मोठा राजकीय भूकंप घडवला आणि त्यानंतर १२ वर्षांनी पुन्हा कॉंग्रेस पक्षालाही रामराम करत राजकीय प्रवासाचं एक वर्तुळ पूर्ण केलं. आता राणे पुढे कुठे जाणार? हे देशातील व राज्यातील काही मोजक्या व्यक्ती वगळता कुणालाच सांगता येणार नाही. राणेंनी कुठे जायचं ते पक्कं ठरवलेलं आहे आणि तिथे ते जाणार आहेत. राणेंनी परवा कुडाळात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ना त्यांच्यासोबत कोणी कॉंग्रेस वा शिवसेनेचे बडे नेते होते ना खासदार-आमदार होते. मात्र, अशा परिस्थितीतही त्यांची जी देहबोली होती तीच राणे आता कोणत्या दिशेने जाणार याचं उत्तर मिळण्यासाठी पुरेशी होती. एकीकडे कोकणात हा कथित राजकीय भूकंपाचा ट्रेलर सुरू होता, तर दुसरीकडे कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राजू शेट्टींचे उजवे हात मानले जाणारे सदाभाऊ खोत त्यांच्या वेगळ्या शेतकरी संघटनेची स्थापना करत होते. महाराष्ट्राने ’दो हंसोके जोडे’ तसे बरेच बघितले. त्यापैकी शेट्टी-खोत हा जोडा अखेर अधिकृतरित्या विभक्त झाला आणि शरद जोशींच्या शेतकरी चळवळीच्या राजकीय प्रवासाचं आणखी एक वर्तुळ पूर्ण झालं.
 
 
कोकणात सिंधुदुर्गातल्या एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या आणि मुंबईत चेंबूर भागात बालपण गेलेल्या नारायण राणे या शिवसेनेच्या कार्यकर्त्याने बघता बघता चेंबूरच्या शाखाप्रमुख पदापासून ते १९९९ मध्ये वयाच्या पन्नाशीच्या आतच राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर शिवसेना सोडणं, कॉंग्रेसमध्ये प्रवेश, कॉंग्रेसमध्ये कधी पक्षासोबत, तर कधी नाराज, महसूल-उद्योग इ. आलटून पालटून मिळालेली मंत्रिपदे आणि २०१४ मध्ये विधानसभेला कुडाळमधून आणि २०१५ मध्ये वांद्य्रात पोटनिवडणुकीतही झालेला दारूण पराभव आदी बारा-पंधरा वर्षांतील इतिहास आपल्या सर्वांसमोर अगदीच ताजा आहे. या काळात राणेंनी काय मिळवलं आणि काय गमावलं, हे राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या लक्षात येईल. राणेंची जाहीर भाषा, नजरेतून व्यक्त होणारे भाव यावरून एक आक्रस्ताळ्या, स्वतःच्याच गुर्मीत वावरणार्‍या नेत्याची प्रतिमा तयार होते. मात्र, दुसरीकडे अत्यंत हुशार, अभ्यासू आणि राजकारण, प्रशासनाची खालपासून वरपर्यंत उत्तम जाण असलेला नेता ही राणेंची दुसरी बाजू फार थोड्या जणांना ठाऊक असेल. विधिमंडळ कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव, उत्तम जाण आणि गांभीर्य असलेल्या राज्यातील आजच्या काही मोजक्या नेत्यांपैकी एक नाव राणे यांचं आहे. आजही राणे जेव्हा विधान परिषदेत बसतात, तेव्हा त्यांच्यासमोर वेगवेगळे संदर्भ, कागदपत्रांचा ढीग पडलेला असतो आणि त्यांच्या भाषणातूनही ते अचूक संदर्भ येत राहतात. मात्र, असं असूनही राणेंची पीछेहाट का होत गेली? हा प्रश्न अगदी त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाही सतावतो. ’समय से पहले और नसीब से ज्यादा कुछ नहीं मिलता,’ असा सल्ला म्हणे विलासराव देशमुखांनी राणेंना दिला होता. कॉंग्रेसी राजकारणाचे धडे विलासरावांपेक्षा अधिक चांगले कोण देणार म्हणा? पण, राणेंना कॉंग्रेस कळलीच नाही, असं म्हणणंही योग्य ठरणार नाही. कारण, पक्षनेतृत्वावर टीका करूनही राणे मंत्रिमंडळात टिकले, मराठा आरक्षणासारख्या नाजूक मुद्द्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली गेली, विधानसभेला दोनदा पराभूत होऊनही राणेंना विधान परिषद मिळाली, दोन मुलगे खासदार-आमदार झाले. त्यामुळे राणेंना कॉंग्रेस कळली होतीच, पण कळलेली वळली मात्र नाही आणि ‘मी माझ्या ताकदीने यामध्ये तग धरेन, सर्वांना माझ्यासमोर यायला भाग पाडेन,’ हा आत्मविश्वास राणेंना नुकसानकारक ठरला.
 
 
सत्तेचा अतिरेक, प्रचंड आर्थिक ताकद, सर्व सत्ताकेंद्रे घरातच असली पाहिजेत हा अट्टाहास, गुन्हेगारी प्रवृत्तीला घातलेलं खतपाणी, त्यात पुन्हा दोन्ही मुलांचा राजकारणातील प्रवेश आणि त्यांची राजकारणाची, लोकांशी वागण्याबोलण्याची पद्धत या सर्व गोष्टींनी राणेंचं राजकारण उलट्या दिशेनं न्यायला सुरुवात केली. निलेश राणे आणि नितेश राणे यांचे त्यांच्याच कार्यकर्त्यांशी वागण्याबोलण्याबाबतचे अनेक किस्से आज कणकवली-मालवणात ऐकायला मिळतात. या सगळ्यात आधीच दुखावलेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग कॉंग्रेसमधील जुन्या कार्यकर्त्यांचा गट उघडपणे राणेंच्या विरोधात गेलाच, शिवाय राणेंचे कट्टर साथीदार म्हणवले जाणारेही एकेक करून राणेंपासून लांब गेले. २००५ मध्ये जे लोक आणाभाका घेत राणेंसोबत आले, त्यापैकी कालिदास कोळंबकर, शाम सावंत वगैरे एकदोन नावं सोडल्यास एकजणदेखील राणेंसोबत नाही. रवींद्र फाटक, राजन तेली, गणपत कदम, सुभाष बने, श्रीकांत सरमळकर, जयवंत परब अशी राणेंना रामराम करणार्‍या नेतेमंडळींची यादी मोठी आहे. आज तर इतकी वेळ आली आहे की, कोळंबकर जाहीरपणे आपली भूमिका मांडू शकत नाहीत. राणेंच्या पत्रकार परिषदेला येणं तर लांबच राहिलं. इतकंच काय तर नितेश राणेदेखील आपल्या वडिलांसोबत राजीनामा देऊ शकले नाहीत. कारण, नितेश काय किंवा कोळंबकर काय, दोघांनाही पोटनिवडणुकीत परत निवडून येणं तितकं सोपं राहिलेलं नाही. अर्थात, कॉंग्रेसही लगेचच त्यांना काढणार नाहीच. कारण, मग विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद गमवावं लागेल. आज रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणे गटाचा एकही खासदार, आमदार (खुद्द नितेश राणे सोडल्यास) नाही, ही सद्यस्थिती आहे.
 
 
आता नारायण राणे स्वतःचा पक्ष काढणार किंवा भाजपमध्ये जाणार, अशा दोन प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. ‘मला भाजपमधून ऑफर’ असल्याचा जप राणे रोज करत आहेत, पण भाजपकडून अजून तरी तसे स्पष्ट संकेत मिळताना दिसत नाहीत. दुसरीकडे आता राणे केवळ त्यांच्या मुलांच्या राजकीय भविष्याची तरतूद करण्याच्याच प्रयत्नात आहेत, अशाही चर्चा आहेत. पण या गोष्टी खर्‍या असल्यास एकेकाळी (आणि आजही) ’आपण कुणाला घाबरत नै,’ अशा गुर्मीत वावरणार्‍या ‘फायरब्रँड’ नारायण राणेंवर, ‘फायर’ गेली आता केवळ ‘ब्रँड’ टिकवण्यासाठी धडपड करण्याची वेळ आली असल्याचं दुर्दैवाने म्हणावं लागेल. प्रादेशिक राजकारणातील दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे राज्यमंत्री सदाभाऊ खोतांनी ’रयत क्रांती संघटना’ या नव्या शेतकरी संघटनेची केलेली स्थापना. राजू शेट्टी आणि सदाभाऊ यांच्यातील वाढत्या दरीची चिन्हं वर्षभर आधीपासून दिसू लागली होतीच. वास्तविक पाहता दोघेही शेतकरी चळवळीतून वर आलेले आणि मर्यादित क्षमता आणि प्रभाव असलेले नेते. मात्र, खोतांकडे मंत्रिपद गेल्यानंतर पक्षांतर्गत दोन सत्ताकेंद्रे निर्माण झाली आणि जे व्हायचं ते झालंच. कोल्हापूर, सांगली आणि सातारा-सोलापूरच्या काही भागांत मर्यादित प्रभाव असलेल्या राजू शेट्टी आणि स्वभिमानीला आता या रयत क्रांतीचं तगडं आव्हान असेल. मात्र, शरद जोशी भाजपसोबत गेले म्हणून वेगळी चूल मांडणार्‍या राजू शेट्टींनी कालांतराने भाजपसोबत जावं आणि नंतर त्यातूनही आणखी एक वेगळी संघटना निर्माण होऊन तीही भाजपसोबतच जावी आणि शेट्टी यांनी मात्र भाजपविरोधाच्या नावाखाली आणि शेतकरी हिताच्या तथाकथित भूमिकेतून पुन्हा भाजपपासून लांब जावं हा राजकारणाचा काव्यगत न्याय म्हणावा लागेल.
 
 
भाजप प्रादेशिक किंवा छोटे पक्ष, नेते संपवतो हा एक हल्ली माध्यमांमधून रंगवून रंगवून सांगितला जाणारा सुविचार आहे. मात्र, या अशा घटना पाहिल्यानंतर भाजप त्यांना संपवतो की तेच स्वतःला संपवून घेतात, असा प्रश्न पडतो. सतत एकच स्वतःचाच चेहरा घेऊन नाही तर आपल्याच घरच्या कोणाला तरी पुढे आणून राजकारण रेटू इच्छिणार्‍यांच्या आशाआकांक्षा छोट्या असतात, त्याचप्रमाणे जनतेला, कार्यकर्त्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे असलेले विचार आणि कार्यक्रमही छोटेच असतात. काळानुसार पुढे जात स्वतःमध्ये व इतरांमध्ये बदल घडवून आणावेच लागतात, नेतृत्वात बदल करावाच लागतो, अन्यथा तुम्ही मागे राहताच आणि इतरांनाही मागे नेता. महाराष्ट्रात शिवसेना, मनसे, उत्तर प्रदेशात मुलायम-अखिलेशचा सप, तामिळनाडूत द्रमुक, अद्रमुक वगैरेंची उदाहरणं आणि सध्या त्यांची सुरू असलेली वाटचाल पाहिली की हीच बाब पुन्हा एकदा स्पष्ट होते.
 
- निमेश वहाळकर