#शक्तीपूजन - श्रवण, कीर्तन आणि स्मरण भक्ती

    दिनांक  22-Sep-2017   

 

एकनाथ महाराज, एका भारुडात त्यांची नवरात्र पूजा सांगतात –

नवविध भक्तीचे करीन नवरात्र

करोनी पोटी मागेन ज्ञानपुत्र

आईचा जोगवा, जोगवा मागेन ||

नाथ म्हणतात - नऊ दिवस मी तुझी नऊ प्रकारे भक्ती करीन. तुझ्यासमोर रोज भक्तीचा एक एक अविष्कार मांडीन. तू माझ्या भक्तीला पावून, मला ज्ञान दे! आत्मज्ञान दे!

 

पहिले तीन दिवस – श्रवण, कीर्तन आणि स्मरण भक्ती. आता पुढे -

 

भागवतात सांगितलेला भक्तीचा चौथा प्रकार आहे  – पादसेवन. सद्गुरूंची किंवा आपल्या उपास्य देवतेची चरण सेवा करणे म्हणजे पादसेवन. अगदी डोळ्यासमोर उभे राहील असे उदाहरण म्हणजे शेषशायी विष्णूच्या पायाशी बसलेली लक्ष्मी. थोडी जरी संपत्ती मिळाली तरी त्याने फुगणारे लोक आपण पाहतो. अशा संपत्तीची स्वामिनी असूनही लक्ष्मीच्या ठिकाणी नम्रताच दिसते! का? तर तिने विष्णूची चरणसेवा केली!


 

 

आणखी एक उदाहरण आहे रामाच्या पादुकांचे पूजन करणाऱ्या भरताचे. भरताने १४ वर्ष रामाच्या पादुकांना सिंहासनावर ठेवून, रामाच्यावतीने केलेले राज्य ही त्याची श्रेष्ठ पादसेवा.

किंवा गुरूंच्या सहवासात राहून, त्यांच्या पायाशी बसून तत्त्वाज्ञान शिकणे ही उपनिषदातील पादसेवा होती.

भक्तीचा पाचवा प्रकार आहे अर्चन, म्हणजे पूजा. आराध्य देवतेच्या मूर्तीची षोडशोपचारे पूजा करणे. चंदन लावून, पुष्प-पत्र अर्पण करून, धूप – दीप लावून, नैवेद्यं दाखवून, आरती करून, प्रेमाने देवाकडे पाहणे ही पूजा. अशी अर्चना बाहेरची. आतली अर्चना म्हणजे मानस - पूजा. ज्ञानेश्वर अतिशय आर्त मानसपूजा सांगतात  –

माझे हृदय शुद्ध करून, मी हृदय चौरंगावर गुरु माउलीची पाऊले स्थापन करेन. माउलीच्या चरणी  इंद्रीयरूपी फुले अर्पण करीन. प्रेमरूपी शुद्ध सोन्याचे नुपूर त्यांच्या पायात घालेन. दृढ भक्तीची जोडवी माउलीच्या बोटात घालीन. अहं धूप जाळून नाहं नंदादीप लावीन. आणि माझ्या शरीर व प्राणाच्या पादुका माउलीच्या चरणात घालून त्यावरून मोक्ष ओवाळून टाकेन!      

माझी तनु आणि प्राण | इया दोनी पाउवा लेऊ श्रीगुरुचरण |

करू भोगमोक्ष निंबलोण | पाया तया || १५.८ ||

अशी गुरुचरणाची जो सेवा करेल, त्याला सहज मोक्ष प्राप्ती होईल. त्याची वाणी अमृतासमान होईल आणि  त्याच्या वक्तृत्वाला इतके माधुर्य येईल की त्यावरून पौर्णिमेचे करोडो चंद्र ओवाळून टाकले तरी ते कमीच होत!

भक्तीचा सहावा प्रकार आहे – वंदन भक्ती. हा भक्तीचा प्रकार अहंकार कमी करणारा आहे. मी कोणीही नाही, असे म्हणून, देवाला अथवा गुरूंना नमस्कार करणे म्हणजे वंदन भक्ती. रामदास स्वामी लीनतेने केलेल्या सूर्यनमस्काराला सुद्धा वंदन भक्ती मानतात.

देवाला शरण जाणे म्हणजे वंदन भक्ती. इथे शरण म्हणजे ‘हार’ नाही! तर शरण म्हणजे देवाच्या चरणी आश्रय घेणे. मोठ्या शक्तीचा आश्रय ज्याने घेतला, तो का निर्भय होणार नाही? तुकाराम महाराज म्हणतात –

बळियाचा अंगसंग जाला आतां ।

नाहीं भय चिंता तुका म्हणे ||

भक्तीचे हे तीनही प्रकार – पादसेवन, अर्चन आणि वंदन ही शारीरिक सेवा आहे. मूर्तीची पूजा आहे. चराचरात ईश्वर ओळखून निसर्गाची, प्राण्यांची, मानवाची सेवा ही याच प्रकारची भक्ती आहे. वृक्ष संवर्धन करणे, सर्पमित्र म्हणून काम करणे, जलव्यवस्थापन करणे, विहीर खणणे, रस्ते बांधणे, वीज निर्मिती करणे, स्वयंपाक करणे, तिकीट विकणे, शिकवणे, कपडे शिवणे, .... प्रत्येक प्रत्येक काम ही ईश्वराची सेवाच आहे! फक्त समोरच्या व्यक्तीवर आपण उपकार करत आहोत अशी भावना न ठेवता, समोरच्या व्यक्तीतील ईश्वराची आपण सेवा करत आहोत ही भावना हवी.

 

स्वामी विवेकानंद म्हणतात -

This is the gist of all worship: God is present in every Jiva; there is no other God besides that. Indeed he who serves Jiva serves God.

फार पूर्वीची गोष्ट आहे. असेल कदाचित दहा – बारा हजार वर्षांपूर्वीची. त्याकाळी भयंकर दुष्काळ पडला होता. खायला प्यायला अन्न नाही, पाणी नाही अशी परिस्तिथी होती. त्यावेळी प्रजेने पृथु राजाला यातून मार्ग काढण्याबद्दल विनंती केली. तेंव्हा पृथु राजा गायीच्या रूपातील भूमीची शिकार करण्यास धावला. तेंव्हा भूमी त्याला म्हणाली, “मला मारलेस तर तुम्हा सर्वांचा अंत निश्चित आहे!” त्यावर पृथु राजाने शस्त्र टाकून, भूमीची सेवा केली. जमीनिची मशागत केली. नांगरणी करून धान्य पेरले. फळझाडे लावली. पशुपालन केले. या सेवेचे फळ म्हणून भूमीने त्याला धान्य, दुध-दुभते, फळे-भाज्या, प्राणी दिले. पृथुने अशा तऱ्हेने प्रजेच्या अन्न-धान्याचा प्रश्न सोडवला. त्याने केलेल्या भूमीच्या सेवेमुळे भूमीला त्याची कन्या मानली जाते. आणि पृथुची मुलगी म्हणून तिला “पृथ्वी” हे नाम प्राप्त झाले.

भागवत पुराणात, विष्णू पुराणात पृथु राजाची कथा येते. महाभारतात त्याची कथा येते. ऋग्वेदात पृथूला ‘ऋषी’ म्हटले आहे. तर अथर्ववेदात पृथु राजाने हलाच्या सहाय्याने नांगरणी करून शेती करणे, पशुपालन करणे यांचा शोध लावला असे म्हटले आहे. हजारो वर्षांपूर्वी नवाश्मयुगातील मानवाची प्रगती शिकार करून अन्न मिळवणे (hunter & food gatherer) पासून शेती व पशुपालन करून अन्न उत्पादन करणे (food-producer) इथपर्यंत झाली. या मोठ्या संक्रमणाचा हा काळ असावा.

प्रजेसाठी पाणी कमी असतांना, अन्न-धान्याची सोय करणे ही पृथु राजाची सेवा – अर्चन भक्ती म्हणून गौरविली जाते.

एकनाथांनी देवीला “तुझी नवविध भक्ती करीन” असे नुसते म्हटले नाही, तर आपल्या वागण्यातून जनता जनार्दनाची पूजा केली. माणसा – माणसात भेदभाव न पाळणारे एकनाथ, मरणासन्न गाढवाला गंगोदक देणारे एकनाथ, कुणावरही क्रोधीत न होणारे एकनाथ – पादसेवन, अर्चन व वंदन भक्तीचे धडे घालून देतात.  

- दिपाली पाटवदकर