शाळा की शवागरे???

    दिनांक  21-Sep-2017   


 

गुरुग्रामच्या सातवर्षीय प्रद्मुम्न ठाकूर हत्येप्रकरणाचे व्रण अजूनही भळभळते असताना उत्तर प्रदेशातील अशाच एका घटनेने ‘शाळा की शवागरे?’ हाच प्रश्न अत्यंत खेदाने उपस्थित करण्याची वेळ आली आहे. आपल्या हक्काच्या घरानंतर मुलांसाठी सर्वाधिक सुरक्षित स्थळ समजल्या जाणार्‍या शाळांमध्येच हल्ली लैंगिक शोषण, खून, आत्महत्या या प्रकारांची आकडेवारी मन विचलित करणारी आहे. कारण, उत्तर प्रदेशातील देओरिया जिल्ह्यातील एका शाळेत नववीत शिकणार्‍या १६ वर्षीय मुलीला चक्क तिसर्‍या मजल्यावरून फेकून दिल्याची हृदयद्रावक घटना नुसतीच उघडकीस आली. उत्तर प्रदेशात, पंजाब, हरियाणातच असे प्रकार घडतात, आपल्याला त्याचे काय?, या भ्रमात महाराष्ट्राच्या पालकांनीही अजिबात राहता कामा नये. कारण, मध्ये दादरच्या एका नामांकित शाळेतही लैंगिक शोषणाचा मुद्दा समोर आला होता. त्यामुळे अशा राक्षसी प्रवृत्तीचे लोक अमुक एका राज्यापुरते, शहरापुरते मर्यादित नसून ते तुमच्या-आमच्यात सर्रास वावरत असतात. फक्त असे काही भयंकर प्रसंग घडल्यावरच संशयाची सुई त्यांच्याकडे वळते, तोपर्यंत शाळेत कामकरणार्‍या किंवा स्कूलबस वाहक-चालकांची कुठलीही माहिती शाळा प्रशासनाकडे उपलब्ध नसते आणि असलीच तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, चारित्र्य, वर्तणूक याविषयी तर सगळा सावळा गोंधळच!

उत्तर प्रदेशच्या या घटनेत सदर मुलीचा वर्ग पहिल्या माळ्यावर, पण शौचालय वापरण्यासाठी ती गेली तिसर्‍या माळ्यावर. याच तिसर्‍या मजल्यावरून तिला खाली ढकलण्यात आले. रक्तबंबाळ विद्यार्थिनीला जवळच्याच रुग्णालयात नेईपर्यंत तिचा मृत्यू झाला. विचित्र प्रकार म्हणजे, हा सगळा प्रकार सदर मुलीच्या मित्रमैत्रिणींनी तिच्या वडिलांना घरी येऊन कळवला. शाळा प्रशासनाने मुलीच्या पालकांना या घटनेबाबत कळविण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. इतकी कसली ही मुजोरी? मुलीला रुग्णालयात नेताना त्या मुलीने खुद्द तिच्या वडिलांकडेही कबुली दिली की, तिला पाठीमागून ढकलण्यात आले. पण दुर्दैवाने, रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्या मुलीचे प्राण वाचू शकले नाहीत. या घटनेनंतर शाळेचे मुख्याध्यापकही गायब झाले आहेत. फोनही बंद. त्यात पालकांच्या संतापाचा उद्रेक होऊ नये म्हणून शाळेलाही टाळे ठोकण्याचा केविलवाणा प्रकार शाळा प्रशासनाने केल्यामुळे पालकांच्या आक्रोशात अधिकच भर पडली आहे. त्यामुळे मुलांना आपण शाळेत पाठवतोय की शवागरात, असा प्रश्न प्रत्येक पालकाला अशा घटनांनंतर पडल्याशिवाय राहणार नाही.

ऍट यूअर ओन रिस्क...

’जबाबदारी’ हा नुसता शब्द उच्चारताच हल्ली भल्याभल्यांना धडकी भरते. मग ती कौटुंबिक जबाबदारीची माळ असो अथवा कामाच्या ठिकाणी काही तरी ‘एक्स्ट्रा’ अंगावर घेण्याची... वैयक्तिक पातळीवर जसे हे डामडौल, तसेच सामाजिक आणि राजकीय जीवनातही कमीअधिक फरकाने त्याचेच प्रतिबिंब पडते म्हणा. म्हणजे, पूल पडला, दहा-बारा लोकं दगावली, तर गेले बिचारे दैवकृपेने. म्हणजे, ना सरकारची जबाबदारी ना पुलाच्या निकृष्ट बांधकामाला कारणीभूत कंत्राटदाराची. पण मग तसेच शाळा, महाविद्यालयांना त्यांच्या आवारात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी झटकून, हात वर करून अजिबात चालणारे नाही. कारण, शाळा, महाविद्यालये यांचे एकूणच बाजारीकरण झाले असले आणि त्यांच्यासाठी विद्यार्थी हे केवळ मिळेल तशी सेवा घेणारे आणि त्या बदल्यात त्यांचे पालक लाखोंची फी भरणारे मशीन जरी असले तरी सामाजिक भान शिक्षणातून हरपलेले असेल तर त्या शिक्षणालाही तिळमात्र अर्थ नाही. शिक्षणही व्यर्थ आणि अशा अमानवीय मनोवृत्तीने ग्रासलेले शिक्षक तर त्याहूनही मोठे गुन्हेगार.

उत्तर प्रदेशच्या याच घटनेचे उदाहरण घ्या. हल्ली शाळा, महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातात. म्हणजे, मुख्याध्यापकांची विद्यार्थ्यांवर तसेच शिक्षकांवरही नजर राहील. उत्तर प्रदेशच्या त्या शाळेतही सीसीटीव्ही होते बरं का, पण नेमकी ही घटना घडली त्याआधीपासूनच ते बंद होते. म्हणजेच, याची पूर्ण माहिती असतानाही शाळा प्रशासनाने कोणतीही पावले का उचलली नाहीत? नेमका त्या निरागस मुलीला तिसर्‍या मजल्यावरून खाली ढकलणार्‍यांनी सीसीटीव्हीच्या या निकामीपणाचा हिशेब लावूनच कशावरून हे कुकृत्य केले नसेल? याची जबाबदारी सर्वस्वी कोणाची? रुग्णालयाचे ऑक्सिजनचे बिल फेडले नाही म्हणून मुले दगावतात, पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही म्हणून स्थानिक निर्धोकपणे मॅनहोल उघडतात आणि एका निष्णात डॉक्टरचा मृत्यू ओढवतो, प्लास्टिक आपण फेकतो, पण बीएमसीच बाबा मुंबई तुंबवते...असे सामाजिक, नागरिक जबाबदारीमुक्त वर्तन भारताला खरंच कुठल्या दिशेने घेऊन जातेय? म्हणजे, आपण कशीही कृती करायची, पण त्याची जबाबदारी झटकायची, असे मतलबी वर्तन कसे परवडेल? मुलांना शाळेत सोडल्यावर त्यांची सर्वस्वी जबाबदारी ही १०० टक्के शाळेचीच! म्हणजे, पालकांनीही आता ऑफिसमधून आपला पाल्य जगला की मेला हे सीसीटीव्हीमधून भीतीने डोकावत राहायचे का? शाळेच्या गेटमध्ये सोडण्यापर्यंत आणि शाळेच्या गेटमधून बाहेर पडल्यावर जशी पालकांसाठी मुले ही ‘ऍट यूअर ओन रिस्क’, मग त्याच नियमाने शाळांना हे जबाबदारीचे भान हरपून कसे चालेल?


-विजय कुलकर्णी