#शक्तीपूजन : नवरात्र १ – नवविधा भक्ती

    दिनांक  21-Sep-2017   

 

आजकाल एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. नवरात्रीचे नऊ दिवस, वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसून सेल्फी नाहीतर ग्रूप फोटो काढणे, आणि ते पेपरात छापून आणणे. रोज एक एकेका ठराविक रंगाची साडी नेसणे वगैरे छानच आहे, कुणाला आवडणार नाही? थोडंस कॉलेजचे दिवस आठवतात. रेड-डे, ब्लू-डे वगैरे, साड्यांना हवा लागते आणि नवीन खरेदीला वाव मिळतो! असो. या प्रकारच्या celebration ने एक देवता नक्की खुश होणार! गृहदेवता!


शारदीय नवरात्रात, काही जण नऊ दिवस उपवास करून देवीची उपासना करतात. काही जण नऊ माळा करतात. काही जण नऊ दिवस नऊ प्रकारचे नैवेद्य दाखवतात. काही जण अखंड नंदादीप लावतात. एकंदरीत अनेक प्रकारे देवीची, शक्तीची उपासना केली जाते. नवरात्रीचा उत्सव अशा उपसानांनी बहरतो! या विविध सोहोळ्यांच्या गर्दीत, संतांचे नवरात्र कसे होते?


एकनाथ महाराज, एका भारुडात त्यांची नवरात्र पूजा सांगतात –


नवविध भक्तीचे करीन नवरात्र


करोनी पोटी मागेन ज्ञान पुत्र


आईचा जोगवा, जोगवा मागेन ||


नाथ म्हणतात - नऊ दिवस मी तुझी नऊ प्रकारे भक्ती करीन. तुझ्यासमोर रोज भक्तीचा एक एक अविष्कार मांडीन. तू माझ्या भक्तीला पावून, मला ज्ञान दे! आत्मज्ञान दे!


नऊ प्रकारच्या भक्तीची कथा भागवत पुराणात सांगितली आहे. त्याची ही गोष्ट –

शुकमुनी परीक्षिताला भागवत सांगतांना.


झाले असे की, परीक्षित राजा एकदा शिकारीला गेला. वनात त्याला खूप तहान लागली, तेंव्हा एका आश्रमात पाणी मागायला गेला. त्या वेळी शमिक ऋषी ध्यान करत होते, व तिथे इतर कोणीच नसल्याने राजाची दखल घेतली गेली नाही. क्षणिक रागाच्या भरात, परीक्षिताने एक मेलेला साप शमिक ऋषींच्या गळ्यात अडकवला व आपल्या वाटेने चालला गेला. त्या ऋषींचा मुलगा, शृंगी काही वेळाने परत आला तेंव्हा त्याने हा प्रकार पहिला. संतापून शृंगीने शाप दिला, “ज्याने असा मृत सर्प एका ऋषीच्या गळ्यात घातला, तो सात दिवसांनी सर्पदंशाने मृत्यू पावेल!”


परिक्षिताला आधीच आपल्या केल्याचे वाईट वाटत होते, त्यात त्याला हा शाप कळला. तेंव्हा पश्चातापाने दग्ध होऊन त्याने विचारले की सात दिवसात माझ्या जन्माचे कल्याण कसे होईल? कोण मला मार्ग दाखवू शकेल? तेंव्हा व्यासपुत्र शुकमुनींनी त्याला उपाय सांगितला, “मी तुला अमृतकथा ऐकवतो. जी ऐकून तू सात दिवसात भवसागर तरुन जाशील.” ही कथा म्हणजे, व्यासांनी रचलेली श्रीमद् भागवत कथा.
शुकमुनींनी भागवत कथा ऐकवली, परीक्षिताने ती मनोभावे ऐकली. आणि खरोखरच हरिकथा ऐकून, हरिभक्तांची कथा ऐकून परीक्षित राजा समाधान पावला.


परीक्षिताचे श्रवण ही पहिल्या प्रकारची भक्ती सांगितली गेली आहे. श्रवण भक्ती बद्दल ज्ञानेश्वर म्हणतात – भगवंताला त्याचे भक्त किती आवडतात? तर भगवंताला त्याच्या भक्ताचे व्यसन लागते, तो भक्ताला मुकुटाप्रमाणे डोक्यावर घेतो, आणि भक्ताला आलिंगन देण्यासाठी तो एकावर एक दोन हात धारण करतो. इतकंच काय, जो त्याच्या भक्तांचे चरित्र ऐकतो तो सुद्धा भगवंताला प्राणांहून प्रिय आहे.


तेही प्राणापरौते | आवडती हे निरुते |
जे भक्त चरित्रातें | प्रशंसती || १२.२२७ ||


भक्ताच्या कीर्तीचे श्रवण अलंकार भगवंत आपल्या कानांत धारण करतो!


रामदासस्वामी म्हणतात – सर्व प्रकारचे श्रवण करावे. देवतांचे गुणवर्णन ऐकावे. भक्तांची चरित्रे ऐकावी. व्रत वैकल्यान्बद्दल ऐकावे. उपासनेबद्दल ऐकावे. भक्तीमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग, ज्ञानमार्ग या बद्दल ऐकावे. हटयोगी, शाक्त, अघोरी पंथांबद्दल ऐकावे. रोग व औषधांबद्दल ऐकावे. चौदा विद्या, चौसष्ठ कलांबद्दल ऐकावे. वेद वाक्ये ऐकावित, उपनिषदातील वाक्ये ऐकावीत. खूप ऐकावे, पण त्यातील असार सोडून देऊन, तत्वांश किंवा रहस्य जाणून घ्यावे, यालाच श्रवण भक्ती म्हणतात.


श्रवणाने काय होते? ज्ञानेश्वर म्हणतात - ज्याप्रमाणे वनात आग लागली असता श्वापदे पळून जातात, त्याप्रमाणे बोध कानातून शिरताच मनातील शंका, वाईट विचार, वाईट सवयी पळून जातात.


गीतेत भगवंत अर्जुनाला म्हणतात – “परिप्रश्नेन सेवया |” अर्जुना, मला प्रश्न विचार, चौफेर विचार करून सर्व बाजूंनी प्रश्न विचार, शुद्ध बुद्धीने प्रश्न विचारून तू ज्ञानामृत श्रवण कर. मनातील संशय निवारण्यासाठी प्रश्नोत्तर रुपी श्रवणबाण हाच उपाय आहे.


प्रत्येक विद्यार्थी मान्य करेल की, खरोखरच कोणतीही नवीन विद्या शिकण्याची पहिली पायरी म्हणजे श्रवण आहे. भक्तीची पहिली पायरी सुद्धा श्रवण आहे! संत एकनाथांनी, परीक्षिता प्रमाणे आपल्याला भावगत श्रवण करायची सोय करून ठेवली आहे. भागवताचा ११ वा स्कंद, नाथांनी मराठीत लिहिला, जो ‘एकनाथी भागवत’ या नावाने तो ओळखला जातो.


शुकमुनींनी कथन केलेली हरिकथा परीक्षिताने श्रवण केली. दोघेही हरिकथा सांगतांना आणि ऐकतांना त्यात रंगून गेले, हरिरूप झाले. ही परिक्षिताची श्रवण भक्ती होती, तर शुकमुनींची कीर्तन भक्ती.


हरिगुण गाणे ही कीर्तन भक्ती सांगितली आहे. कसे करायचे हरिगुणगान? तर –


हरि होऊनी हरि गुण गावे


हरिगुणगान केल्याने हरिच्या गुणांची ओळख होते. हरिचे गुण थोडे थोडे आत्मसात केले की त्याचे गुणवर्णन करतांना रंगत येते. आणि शेवटी हरिगुण गात गात हरिरूप होता येते!


कीर्तन भक्ती करणारे श्रेष्ठ भक्त म्हणजे नारद मुनी. हातात वीणा घेऊन हरीस्तुती करत त्रिभुवनात संचार करणारे नारद मुनी नारायणाचे परम भक्त.


नारदांनी लिहिलेली “भक्ती सूत्रे” या ग्रंथात - भक्ती म्हणजे काय? कशी करायची? भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग आणि योगमार्ग यातील कोणता श्रेष्ठ? कोणता सहज? भक्त कोणाला म्हणायचे? भक्ताची लक्षणे काय? भक्तीचे फळ काय? भक्तीचे प्रकार कोणते? भक्ती वाढवायची कशी? आदि गोष्टी नारदीय भाक्तीसुत्र मध्ये सांगितल्या आहेत.


रामदासस्वामींनी सांगितलेली कीर्तन भक्ती ही कोणत्याही वक्त्यासाठी, शिक्षकासाठी, Trainer, Presenter साठी उत्कृष्ट Instruction Manual आहे. कीर्तन कसे करावे? श्रोत्याला झोप येऊ नये, त्याचे मन आनंदाने भरून जावे, विविध कविता, गोष्टी सांगून त्याचे मनरंजन करावे. पण सूत्र हातातून सुटता कामा नये! सांगण्यामध्ये विविध रस असावेत हास्यरस, करुणरस असावा. वीररसात भिजलेले पोवाडे असावेत. आणि महत्वाचे म्हणजे वेदांचा अभ्यास करून पुराणे सांगावीत.


लहान मुल जसे आधी खूप ऐकते, आणि मग एक एक शब्द बोलू लागते, तसे भक्तीची पहिली पायरी श्रवण व दुसरी पायरी कीर्तन आहे. या नंतरची तिसरी पायरी आहे – स्मरण. श्रवण आणि कीर्तन ही बाहेरील भक्ती झाली. स्मरण ही आतली भक्ती आहे. मनाची भक्ती आहे.
अखंड स्मरण राखायचा मार्ग संतांनी असा सांगितले आहे – प्रत्येक काम सुरु करतांना आराध्य देवतेचे स्मरण करायचे. स्मरणाने तिचे गुण डोळ्यासमोर येतात. सहजच आपल्या हातून घडणारे काम उत्तम पार पडते. आणि काम झाल्यावर - “कृष्णार्पणमस्तू” म्हणून पुनश्च स्मरण. म्हणजे काम करून झाल्यावर फलाची आशा न धरता, बाजूला होता येते.


स्मरण राखण्यासाठी आणखी एक सांगितलेला मार्ग आहे अखंड नामस्मरण. हा मार्ग अनुसरणारे – ध्रुव, प्रल्हाद, वाल्मिकी पासून कबीर, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, गुरु नानक पर्यंत सर्व संतांनी हा राजमार्ग म्हणून गौरविला आहे. कृष्णाने गीतेत म्हणले आहे – “यज्ञांनां जपयज्ञोस्मी” - सर्व यज्ञांमध्ये मी जप यज्ञ आहे!


नाथांनी भारुडात म्हणल्याप्रमाणे नवरात्रीचे पहिले तीन दिवस – श्रवण, कीर्तन व स्मरण भक्तीचे. देवी महात्म्य ऐकायचे, देवीचे गुणगान करायचे, देवीचे स्मरण राखायचे. देवीसारखे गुण आत्मसात करायचा प्रयत्न करायचे. तिच्यासारखे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची, निर्भय होण्याची आणि चराचरावर मातृवत् प्रेम करायची शक्ती मिळवण्यासाठी हा अट्टाहास.

 

- दीपाली पाटवदकर