कर्जमाफी अर्जामध्ये शेतकऱ्यांनी सर्व बँकाकडील कर्जाची माहिती देणे अनिवार्य

    दिनांक  20-Sep-2017सर्व शेती कर्जाची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्र

बुलडाणा : शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेमार्फत देण्यात येणाऱ्या कर्जमाफीचा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी सर्व बँकांकडील कर्जाची माहिती देणे अनिवार्य आहे. अन्यथा असे शेतकरी कर्जमाफीचे अपात्र ठरतील असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या अर्जामध्ये हि माहिती दिलेली नाही त्यांनी तातडीने ही माहिती अर्जात भरावी, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या आदेशानंतर मात्र शेतकऱ्यांची चांगली धावपळ उडाली आहे. अर्ज भरताना अनेक अडचणींचा सामना करवा लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अर्जात दुरुस्तीचे आदेश दिल्यामुळे अनेकांकडून यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.


छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतंर्गत अर्ज भरण्याची शेवटची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले अर्ज तातडीने जमा करावेत. मात्र शेतकऱ्यांनी विविध बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खात्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक व ग्रामीण बँक अशा सर्व बँकांचा समवेश करण्यात आला आहे, त्यामुळे अर्जदारांनी ही माहिती तातडीने भरावी, माहिती न भरल्यास असे अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहेत, असे प्रशासने सांगितले आहे.


याच बरोबर अशी माहिती भरण्यासाठी शेतकऱ्यांना नव्याने अर्ज भरण्याची गरज नसून या अगोदर भरलेल्या अर्जामध्ये एडीट ऑप्शनद्वारे ही माहिती भरावी, असे देखील प्रशासनाने सांगितले आहे.