मोदींवर भरवसा हाय ना!

    दिनांक  02-Sep-2017   
 
 
 
 
‘नोटाबंदीचा फुगा फुटला, जीडीपीचा दर गडगडला’ म्हणत विरोधकांना मोदींवर आसूड ओढायचे आयते कोलितच मिळाले. मोदींनी निश्चलनीकरणाच्या निर्णयातून कशी हिरोगिरी केली, स्वत:ची पाठ थोपटवून घेतली, याचे काही कांगावाखोर माध्यमांनी लागलीच रान पेटवले पण या तथाकथित माध्यमवीरांची मते कितीही तीव्र असली, त्यांनी कितीही आकांडतांडव केले तरी निश्चलनीकरणाला लोकांचा मिळालेला जनाधार त्यांनाही झिडकारून चालणार नाही. जनतेने त्रास सहन करत, रांगेच्या कळा सोसत हे आपल्याच देशाच्या व्यापक हितासाठी आहे, या राष्ट्रभावनेने या निर्णयाचे स्वागत केले. त्यामुळे जरी रिझर्व्ह बँकेची आकडेवारी जवळजवळ ९९ टक्के निश्चलीत नोटा जमा झाल्याचे सांगत असली तरी त्या निर्णयाचा दूरगामी परिणाम पूर्णत: नाकारूनही चालणार नाही. त्यामध्ये विशेषत्वाने आयकर भरणार्‍यांची वाढलेली संख्या, आर्थिक व्यवहारांबाबतची एकूणच दक्षता, गैरव्यवहार केल्यास सरकारी यंत्रणांच्या कारवाईची भीती आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन यासारखे दीर्घकालीन लाभ दुर्लक्षित कसे बरं करता येतील?
 
 
त्यामुळे नोटाबंदीनंतर बर्‍यापैकी आर्थिक परिस्थिती नियंत्रणात असली तरी भ्रष्टाचाराची कीड काही शासकीय यंत्रणांतून अजूनही उखडलेली नाही. ‘ट्रान्स्फरन्सी इंटरनॅशनल’ नामक आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन संस्थेच्या एका नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, आशिया खंडातील देशांत भारताचा अजूनही भ्रष्टाचारात प्रथमक्रमांक लागतो. १८ महिने, १६ देश आणि २० हजार नागरिकांच्या सर्वेक्षणातून भारतात लाचखोरीचे प्रमाण तब्बल ६९ टक्के आहे. त्याखालोखाल नंबर लागतो तो व्हिएतनाम, थायलंड, पाकिस्तान आणि म्यानमारचा. ‘फोर्ब्स’मध्ये या आकडेवारीच्या आधारे प्रसिद्ध झालेल्या लेखामध्येही भारतातील ६ पैकी किमान ५ सार्वजनिक ठिकाणी सर्रास लाचखोरी होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शाळा-कॉलेजपासून ते अगदी सार्वजनिक रुग्णालयांपर्यंत लाचखोरी आणि भ्रष्टाचार पुरता बोकाळला असून मोदी सरकारच्या कडक पवित्र्यानंतरही सरकारी बाबूंच्या खाबुगिरीत मात्र बदल झालेला नाही. तरी एक दिलासाजनक बाब म्हणजे, मोदी सरकार भ्रष्टाचाराला संपविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचेही अहवाल सांगतो. ५३ टक्के लोकांना मोदी योग्य दिशेने जात असल्याचे वाटते, तर ६३ टक्के लोकांना सामान्य माणूसही या भ्रष्टाचाराच्या परिस्थितीत बदल घडवून आणू शकतो, असा विश्वास वाटतो. तेव्हा, सरकारी यंत्रणेवर अजूनही भरवसा नसला तरी मोदींवर मात्र लोकांचा भरवसा कायमआहे, असेच म्हणावे लागेल.
 
 
 
नागरी शिस्तीवरच भिस्त
 
मुद्दा स्वच्छतेचा असो वा लाचखोरीचा, नागरिकांनी स्वत:ला एकदाच कडक शिस्त लावून घेतली की, संविधानाचा आदर करत सर्व कायदे-नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास बर्‍याच समस्यांचा गुंता आपसूकच सुटण्यास हातभार लागतो. त्यामुळे ‘नियमहे तर मुळी तोडण्यासाठीच असतात, इतर लोक करत नाही ना, तर मी काय प्रामाणिकपणाचा ठेका घेतलाय,’ असा आपमतलबी विचार प्रत्येकाने केला, तर भारत लाचखोरीच्या भ्रष्ट गर्तेतून बाहेर पडणे कदापि शक्य नाही. तेव्हा, स्वच्छतेची शपथ घेतल्याप्रमाणे आपणही ’ना खाऊँगा, ना खाने दूँगा’ या मोदीनीतीचा अवलंब आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात केल्यास भ्रष्टाचाराचा भारतावर लागलेला हा कलंक पुसता येईल. त्यासाठी केवळ ’मनी निश्चय अन् कृतीत दुराचार’, असे वर्तन अजिबात अपेक्षित नाही. मग ते ट्रॅफिक पोलिसांना मोठा दंड चुकविण्यासाठी दिलेली चिरीमिरी असेल अथवा बड्या अधिकार्‍यांच्या टेबलाखालून सरकवलेले पाकीट, यावर वैयक्तिकरित्या अगदी सरसकट बंदी लादा! सुरुवातीला हा तात्त्विक विचार अमलात आणणे अति वाटेल किंवा कशाला उगाच हा आव, वगैरेही कुविचार निश्चयाचा महामेरू डळमळीत करतील, पण सुरुवात ही इतरांपासून नाही, तर आपल्यापासून करण्याचा आदर्श स्वत:लाच घालून दिला पाहिजे. किमान आपल्या देशात सामान्य जनतेच्या मनात परिस्थिती बदलू शकते, असा विश्वास तरी आहे, पण अंदाधुंद कारभारात आकंठ बुडालेल्या पाकिस्तानात सामान्य जनतेला तेथील तीन चतुर्थांश पोलीस यंत्रणाच भ्रष्ट वाटते. सरकारी कर्मचारी असलेल्या पोलिसांनीही १० पैकी ७ पाकिस्तानींना लाच देऊन आपली कामे करवून घ्यावी लागतात, यातच सर्व काही आले.
 
 
गेल्या वर्षी याच संस्थेने प्रसिद्ध केलेल्या भ्रष्टाचाराच्या क्रमवारीत १६८ देशांमध्ये भारत ७६ व्या क्रमांकावर होता आणि याही वर्षी ही बिकट परिस्थिती फारशी बदललेली नाही. अजूनही मुलांच्या ऍडमिशनसाठी शासकीय शाळांमध्ये ५८ टक्के लोकांनी लाच दिल्याचे कबूल केले, तर सरकारी रुग्णांमध्येही उपचारांसाठी तब्बल ५९ टक्के लोकांना लाचखोरीचा सामना करावा लागला. हा अहवाल आणि त्यातील आकडेवारी प्रातिनिधिक म्हणून जरी काही क्षणासाठी मान्य केली तरी कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकाला सरकारी धोरणांच्या या अरेरावी कारभाराला सामोरे जावेच लागते. तेव्हा, लाचखोरीला लाथ मारा अन् नागरी शिस्तीची भिस्त राखा!
 
- विजय कुलकर्णी