शेतकऱ्यांनी माल साठवणूक करताना गोदामाच्या परवान्याची खात्री करावी

    दिनांक  17-Sep-2017बुलडाणा : शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी शेतकरी आणि माल साठवणूकदारांनी कोणत्याही गोदामात माल साठवणूकीस ठेवताना गोदामाचा परवाना तपासून पाहावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये सहकारी संस्था, खाजगी गोदाम व्यावसायिक तसेच गोदाम पावती योजनेतंर्गत व्यवसाय करणाऱ्या काही संस्था व व्यावसायिक विना परवाना शेतकऱ्यांचा मालांची साठवणूक करून घेत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी सावध राहून अगोदर चौकशी करावी आणि मगच निर्णय घ्यावा असे आवाहन प्रशासने केले आहे.

शेतकऱ्यांनी कोणत्याही गोदामात आपला माल साठवण्यास देण्या अगोदर गोदामाच्या परवान्याची चौकशी करावी. गोदामाचा परवाना जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या कार्यालयातून घेतलेला किंवा नुतनीकरण केलेला आहे किंवा नाही, याची खात्री करावी. खात्री केल्यानंतरच माल सदर मोदामामध्ये ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे प्रशासने सांगितले आहे. तसेच विनापरवाना माल साठवणूक तारण पावती आणि तत्सम प्रकारचा व्यवसाय करीत असलेल्या व्यावसायिकांना देखील प्रशासने खबरदार केले आहे. मुंबई वखार अधिनियमाच्या कलम ११ नुसार सहकारी संस्था, खाजगी गोदाम व्यावसायिक तसेच गोदाम पावती योजनेतंर्गत व्यवसाय करणाऱ्या संस्था व व्यावसायिक आस्थापना यांना गोदाम परवाना घेणे बंधनकारक आहे. अशाप्रकारे परवाना नसताना माल साठवणूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.