साहित्य संमेलन संस्थानाच्या बटिक राहावे अशी काहींची भावना - मालपाणी

    दिनांक  15-Sep-2017


हिवरा आश्रमाचा प्रस्ताव मागे

बुलढाणा : 'साहित्य संमेलन हे नेहमीच संस्थांचे बटिक रहावे, अशी काही लोकांची इच्छा आहे. साहित्य संमेलन पहिल्यांदा ग्रामीण भागात होत आहे. या गोष्टीचा सर्वाना आनंद झाला होता. परंतु काही लोकांच्या तुच्छ आरोपांमुळे हिवरा आश्रमाचे नाव बदनाम होत असेल. तर संमेलन दुसऱ्या ठिकाणी घेतलेलेच चांगले' अशा शब्दात हिवरा आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी काल आपली नाराजी व्यक्त केली. तसेच यंदाच्या प्रस्तावित साहित्य संमेलन हिवरा आश्रमात घेण्यासंबंधी पाठवलेला प्रस्ताव मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


अंधश्रद्धा निर्मुलन समिती हिवरा आश्रमावर केलेल्या आरोपामुळे आश्रमाने आपला प्रस्ताव मागे घेतला असल्याचे मालपाणी यांनी सांगितले. स्वामी विवेकानंद आश्रम हे नेहमीच पुरोगामी विचार हृदयाशी धरून चालले आहे. 'मानवसेवा हीच ईश्वरसेवा' हे आश्रमाचे ब्रीद आहे. आश्रमाने जातीपातीच्या भिंती तोडून समाजाला एकत्र करण्यासाठी प्रयत्न केले आहे. गरीब आणि दु:खितांची सेवा याठिकाणी केली जाती. लोकांना विवेकाचा अनुग्रह याठिकाणी दिला. साहित्य आणि विद्याचा यांना ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी याठिकाणी साहित्य संमेलन व्हावे, अशी आमची इच्चा होती. परंतु शुकदासांच्या बदनामीचा काही अदृश्य शक्तीने रचलेल्या कटामुळे ही इच्छा आता पूर्ण होऊ शकणार नाही. साहित्य संमेलनासाठी राबू इच्छिणारे हजारो हात आता यासाठी राबू शकणार नाही' असा तीव्र शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.


अंधश्रद्धा निर्मुलन समितीने हिवरा आश्रमाचे संस्थापक शुकदास यांच्यावर अनेक आरोप करत आश्रमामध्ये साहित्य संमेलन घेऊन नये, अशी मागणी अ.भा.साहित्य संमेलन महामंडळाकडे केली होती. आश्रमामध्ये अंधश्रद्धेला चालना देणाऱ्या घटना घडतात, तसेच शुकदास हे एक पाखंडी असल्याचे आरोप समिती केले होते. त्यामुळे हिवरा वगळून दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी संमेलन घेतले जावे, अन्यथा या विरुद्ध समितीकडून आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा समितीने दिला होता. समितीच्या या भूमिकेला आश्रमाने देखील जशासतसे उत्तर देत यातून संमेलनाचा आयोजनातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. हिवरा आश्रमाने माघार घेतल्यानंतर संमेलन बडोद्यामध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.