नवरात्रोत्सव उत्सवासाठी परवाना देण्याची प्रक्रीया आता ऑनलाईन

    दिनांक  15-Sep-2017


बुलडाणा : सार्वजनिक गणेशोत्सव संपल्यानंतर आता जिल्ह्यात सार्वजनिक नवरात्रोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. यासाठी सार्वजनिक मंडळांना लागणारा परवाना देण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आली आहे. तसेच परवाना मिळवण्यासाठी मंडळाने मागील वर्षीच्या उत्सवाच्या जमाखर्चाची सर्व माहिती सदर करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे.


मंडळांनी www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मंडळांना मुंबई सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ क अन्वये सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी जमा करण्याकरिता सहायक धर्मदाय आयुक्तांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच संस्था नोंदणी अधिनियम १९६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा १९५० अन्वये नोंद असलेल्या व ज्यांच्या उद्देशामध्ये नवरात्रोत्सव उत्सव साजरा करणे असा उल्लेख असणाऱ्यांना अशी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असे देखील प्रशासनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


तसेच तात्पुरत्या स्वरूपातील परवानगीसाठी अर्ज करतांना मागील वर्षी परवानगी घेतलेल्या संस्थांनी मागील वर्षीचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नविन परवानगी अर्ज करतेवेळी त्या-त्या क्षेत्रातील नगरसेवक, ग्रामपंचायत यांच्याकडील त्यांचे याठिकाणी सार्वजनिक उत्सव साजरा करण्यास अनुमती असल्याचे संमतीपत्र व प्रथम वर्ष असल्यास दाखला देणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे.