अल्पसंख्यांक बहुल शाळांसाठी अनुदान योजना जाहीर

    दिनांक  01-Sep-2017बुलडाणा : जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बहुल शाळांसाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत संबंधित शाळांना २ लाख रुपयांपर्यत शासकीय अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्यामुळे इच्छुक शाळांनी येत्या १८ सप्टेंबर पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण व अपंग शाळा यांना पायाभूत सोयी-सुविधांसाठी हे अनुदान देण्यात येणार आहे, असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यासाठी शासनमान्य असलेल्याच खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व न.प शाळांना अर्ज करता येणार आहे. या शाळांमध्ये अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख व पारशी) मिळून किमान ७० टक्के विद्यार्थी शिकत असावे. तसेच शासन मान्यताप्राप्त अपंग शाळांमध्ये किमान ५० टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. असे असल्याच संबंधित शाळांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून आपले अर्ज सादर केल्यास त्यांना २ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी फुंडकर यांनी स्पष्ट केले आहे.