
उंची 6 फूट 5 इंच, वय वर्ष 31, मुळ जमैकाचा निवासी किर्ती मात्र संपूर्ण जगभर पसरलेली. जगज्जेता धावपटू म्हणून आज सर्वत्र ज्याच्या नावाचे कौतुक केले जाते असा हा उसेन बोल्ट. जागतिक दर्जाच्या स्पर्धेत तब्बल 9 सुवर्ण पदक मिळविलेला उसेन हा एकमेव धावपटू. मैदानातील पदकांशिवाय उसेनला जनमानसातूनही विविध किताब मिळाले. ‘सर्वात वेगवान मानव’ असा सर्वोच्च किताब आज उसेनच्या नावावर आहे. गेल्या काही दिवसातच उसेनने लंडन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेतून आपल्या करिअरमधील शेवटची रेस खेळली. 100 मीटरच्या स्पर्धेत त्याला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असून यात त्याला कांस्य पदक मिळाले. पण या स्पर्धेत त्याला मिळालेल्या अपयशावरून त्याच्या खेळीवर किंवा त्याच्या क्षमतेवर शंका घेऊन चालणार नाही. कारण अनेको वर्षांनंतर कधीतरी कुठेतरी एखादा ‘बोल्ट’ जन्माला येत असतो आणि त्यामुळेच पुढील काही वर्षांसाठीतरी ‘ऐसा बोल्ट होणे नाही!’ असं आपण म्हटलो तर ते अधिकचे ठरणार नाही.
उसेन बोल्टने आजपर्यंत किती पदकं मिळविली किंवा तो कशासाठी प्रसिद्ध आहे, हे आपण सगळे जाणूनच आहोत. दोन दिवसांपूर्वी त्याने खेळातून घेतलेल्या निवृत्तीनंतर त्याच्या या संपूर्ण कारकिर्दिवर अनेकांनी प्रकाशझोतही टाकला असेल. पण या सगळ्यामध्ये उसेनच्या या अद्वितीय कामगिरीच्या मुळाशी जाण्याचा फारच कमी माध्यमांनी प्रयत्न केला. याविषयी अधिक माहिती गोळा करताना काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. उसेन बोल्टने निवृत्त होण्याअगोदर डॅलस येथील ‘साऊदर्न मेथॉडिस्ट युनिर्व्हसिटी’ने (एसएमयु) एक अभ्यासपूर्ण संशोधन जगासमोर मांडले आहे आणि विशेष म्हणजे या परिक्षणाला त्यांनी वैज्ञानिक गोष्टींची जोड दिली आहे. त्यामुळे या संशोधनावर विचार करणं अनिवार्य वाटत आहे.

आज उसेन बोल्ट 31 व्या वर्षात पदार्पण करीत आहे, पण तरीसुद्धा संशोधकांना त्याच्या या यशाबद्दल उत्सुकता आहे आणि त्याचं नेमक गमकही अजून त्यांना उमगलेलं नाही. ‘एसएमयु’च्या बायोमेकॅनिक्समध्ये पारंगत असणार्या संशोधकांनी त्यांच्या अहवालात अशी मांडणी केली आहे की, उसेन हा एक असामान्य व्यक्ती असावा. उसेनचे स्पर्धेतील काही व्हिडिओ बघितल्यावर अशा आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. त्याचा उजपा पाय डाव्या पायापेक्षा 13 टक्के अधिक क्षमतेने/बळाने धावपट्टीवर आदळला जातो. तर दुसरीकडे त्याचा डावा पाय उजव्या पायापेक्षा 14 टक्क्यांनी अधिक वेळ जमिनीवर राहतो. या वैज्ञानिक निष्कर्षावरून असे सिद्ध होते की, उसेनची धावण्याची ही पद्धत सामान्य व्यक्ती सारखी नसून ती असामान्य आहे.
‘एसएमयु’मधील मुख्य शोधकर्ता उडोफोने उसेन बोल्ट व त्याचा मधला कडवा प्रतिस्पर्धी मोनाको यांच्या 2011 मधील एका स्पर्धेच्या व्हिडिओचा आधार घेतला आहे. या व्हिडिओमधून शेजारीच दाखविलेल्या ग्राफ्रिक्समधून काही गोष्टी अधिक स्पष्ट होत आहेत. बोल्टने या स्पर्धेत पळताना आपल्या उजव्या पायाची शक्ती 1080 पाऊंडाने जमीनीवर आदळली आहे तर डाव्या पायाचा जोर 955 पाऊंडाच्या शक्तीने जमीनीवर आदळला आहे. यावरून पुन्हा एकदा शोधकर्त्यांनी उसेनच्या दोन्ही पायांच्या क्षमतेमधील भिन्नता दाखविण्याचा याठिकाणी प्रयत्न केला आहे.
उसेन बोल्टची उंची हे त्याच्या यशामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे असे आजपर्यंत अनेकांनी सांगून झाले आहे. त्याच्या उंचीमुळे 100 मीटरची दूरी तो केवळ 41 पाऊलांमध्ये पार करू शकतो तर त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना कदाचित यासाठी 43, 45 किंवा 48 पाऊलांचीही गरज भासत असेल. एखादा स्पर्धक जिंकण्यासाठी आपली धाव अधिक वेगवान करत असेलही पण उसेन पहिल्या 60 ते 70 मीटरपर्यंत इतक्या वेगाने धावतो की उर्वरीत 40 ते 30 मीटरमध्ये त्याने त्याचा वेग जाणून बुजून कमी केला तरी इतर स्पर्धक त्याला गाठू शकत नाही, हे देखील या संशोधनातून सिद्ध करण्यात आले आहे.

उसेन बोल्टच्या वरील अभ्यासपूर्ण व्हिडिओला जोड देण्यासाठी ‘एसएमयु’ने सामान्य मनुष्य व इतर अॅथलेटिक्स यांच्या धावण्याच्या क्षमतेचा अभ्यास केला आहे. यामधून उसेन बोल्ट व इतर धावपटू यांच्यातील फरक अधिक स्पष्ट होण्यास मदत होते.
‘एसएमयु’ने सादर केलेले संशोधन अतिशय विस्तारपूर्ण असून त्यामधून उसेनच्या विविध कौशल्यांवर भाष्य करण्यात आले आहे. उसेन बोल्ट असामान्य आहे का, या प्रश्नाचे अंतिम उत्तर अजून त्यांनाही मिळालेले नसून त्यांचे संशोधन चालूच आहे. या संशोधनाची संपूर्ण आवृत्ती तुम्हाला S.M.U. study of Bolt या लिंकवरून प्राप्त होऊ शकते. पुन्हा एक सुरूवातीला नमूद केल्याप्रमाणे उसेनच्या एकूणच कारकिर्दिवर शंका घेऊन चालणार नाही पण प्रश्न फक्त एवढाच उरतोय की तो सामान्य माणूस असून असामान्य कामगिरी करतोय की तो खरोखरीच एक असामान्य व्यक्ती आहे...