जिल्हा नियोजन समितीसाठी जिल्ह्यात ९७.२३ टक्के मतदान

    दिनांक  08-Aug-2017बुलडाणा : जिल्हा नियोजन समितीसाठी घेण्यात आलेले मतदानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण दिवसभरात जिल्ह्यात ९७.२३ टक्के इतक्या मतदानाची नोंद करण्यात आली असून पुरुषांपेक्षा महिला सभासदांनी मतदानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.


आज सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. जिल्ह्यातील ३०६ मतदारांसाठी एकूण १४ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. यामध्ये बुलडाणा तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्र होती. त्यापैकी एक केंद्र जिल्हा परिषद सदस्य मतदारांकरीता, तर दुसरे नगर परिषद सदस्य मतदारांकरीता राखीव ठेवण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात नगर परिषद सदस्य मतदारांकरीता मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती.


या निवडणूकीकरीता स्त्रिया २०४ व पुरूष १५७ अशी मिळून एकूण मतदारसंख्या ३६१ एवढी होती. त्यापैकी बुलडाणा (नागरी), चिखली, दे.राजा, सिं.राजा, लोणार, मेहकर, खामगांव, संग्रामपूर, जळगांव जामोद, नांदुरा, मोताळा व मलकापूर मतदान केंद्रावर १०० टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. व मोताळा ९४.१२, शेगांव ९६.३० व बुलडाणा ग्रामीणमध्ये सर्वात कमी म्हणजे ८६.६० टक्के इतक्या मतदानाची नोंद करण्यात आली आहे..