Tech भारत - QR कोड नेमकी काय भानगड आहे ?

08 Aug 2017 21:26:14


 



मी आणि रुचिता परवा मूव्हीला गेलो होतो. नेहमी प्रमाणेच बुक माय शोच्या अॅपवरून तिकीट बुक केली आणि निघालो. एम-तिकीट काढल्यामुळे आम्हाला पुन्हा जाऊन वेगळ्या रांगेत उभे राहावे लागले नाही. कारण मोबाईलवरच आमचे तिकीट तयार झाले होते. तेथील स्कॅनरच्या सहाय्याने थिएटर कर्मचाऱ्याने आमचे तिकीट स्कॅन केले आणि आम्हाला आत सोडले. शेजारची मोठी रंग पाहून रुचिताच्या मनात सहज विचार येऊन गेला. "आजकाल एम-तिकीटमुळे खूप सोपे झाले आहे ना, QR कोड स्कॅन केला की संपले काम...! ना कागद सांभाळायची झंजट, ना रांगेत उभे राहण्याचा त्रास." "पण मला सांग ही QR कोड काय भानगड आहे ? समोरच्याला कसे कळते, आणि तयार कसे होतात ?"

आणि तिच्या प्रश्नामुळे मला या आठवड्याचा Tech भारतचा मुद्दा सापडला...! खरच आपण अनेक ठिकाणी QR कोडचा वापर करत असतो, मूव्ही तिकीट पासून ते एखाद्या इव्हेंटच्या एंट्री कार्डच्या प्रवेशाकरिता देखील तेच तपासले जाते. मात्र तो नेमका कसा तयार होतो ? त्याच्या मागे माहिती कशी दडून राहते ? याबद्दल आपण जास्त विचारच करत नाहीत. तसे जास्त कठीण नाही, सोपेच आहे. चला तर जाणून घेऊयात...

QR कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड (जलद प्रतिसाद देणारा) होय. हा बारकोडपेक्षा आधुनिक प्रकार आहे. याचा शोध १९९४ साली डेन्सो वेव्ह नामक टोयोटाच्या सह-कंपनीने लावला होता. डेन्सो वेव्हमध्ये याचा उपयोग गाड्यांच्या विविध भागांच्या माहिती करिता केला जात असत. तसेच हे सर्व भाग जलद गतीने स्कॅन करता यावे असा देखील उद्देश्य यामागे होता. डेन्सो वेव्हने याचे पेटंट घेऊन मोफत वितरण केले, आणि त्यामुळेच आपल्याला आज इन्टरनेटवर त्याचा वापर करता येत आहे. 

बारकोड आपल्यासर्वांना माहिती आहे. बारकोड स्कॅनिंगद्वारे विविध वस्तूंच्या किंमती मोजून बिल बनताना मॉलमध्ये आपण पहिलेच असेल. त्यात एक त्रुटी असल्यामुळे एका वेगळ्या स्कॅनिंगची आवश्यकता भासली. बारकोडमध्ये केवळ १२ आकड्यांमध्ये माहिती साठवता येते. मात्र QR कोडमध्ये त्यापेक्षा १०० पटीने अधिक प्रमाणात माहिती साठविली जात असते. बारकोड 1D तंत्राच्या आधारावर काम करत असतात, मात्र QR कोड 2D तंत्राच्या आधारावर काम करत असल्यामुळे स्वाभाविकपणे माहितीची क्षमता वाढून जाते. QR कोडमध्ये तीन मुख्य चौकटी असतात ज्या संरेखन लक्ष्य म्हणून काम करत असतात. म्हणजे तीन चौकटी दरम्यान असलेल्या छोट्या-छोट्या काळ्या आणि पांढऱ्या डॉट्सला जोडण्याचे त्यांचे काम असते. या लहान लहान डॉट्समध्ये अंकीय आराखड्यात(न्यूमेरिक), अथवा अक्षरअंकिय आराखड्यात(अल्फान्यूमेरिक), अथवा बायनरी(शून्य आणि एकच्या सांख्यिक आकडेवारीत) स्वरुपात मुख्य माहिती साठवलेली असते. स्कॅनिंग करताना संपूर्ण माहिती या डॉट्स रूपातून पुन्हा सामान्य रुपात बदलली जाते.




 

QR कोड अधिकाधिक शब्द सामावून घेत असते. सुरुवातीला २१ बाय २१ चे पिक्सेल असणारा QR कोड केवळ ४ शब्द सामावत असे, मात्र आता १७७ पिक्सेल चौकट विकसित झाल्यामुळे १८५२ शब्द यात मावू शकता. QR कोडचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, यात असलेल्या माहितीनुसार यातील आकारात बदल होत असतात. कमी शब्द साठवलेल्या QR कोडमध्ये पांढरे आणि काळे डॉट्स विरळ स्वरुपात असतात, तर जास्त माहिती साठवलेल्या QR कोडमध्ये दाट डॉट्स तयार होतात. 

आज प्रत्येक क्षेत्रात QR कोडचा वापर केला जातो. आधीच्या काळी केवळ ऑटोमोबाईल बाजारपेठेत होणारा QR कोडचा वापर सीमित राहिला नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध स्कॅनिंग करिता उपयुक्त ठरतो. यामुळे माहिती साठविणे देखील सोपे आणि सुरक्षित झाले आहे. त्यामुळे जनसामान्यांना याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. Tech भारतच्या माध्यमांतून मराठी वाचकांना देखील याची माहिती असावी म्हणून हा प्रयत्न होता. 

- हर्षल कंसारा

Powered By Sangraha 9.0