दुष्प्रचार युद्ध- ‘ऑपरेशन स्मिअर’ जिंकणे जरुरी!

    दिनांक  07-Aug-2017   
 

 
 
भारताविरोधात दुष्प्रचार करण्यासाठी अनेक तज्ज्ञांना विकत घेतले गेले. यामध्ये भारताविरोधात लेख लिहून भारताला बदनाम करणार्‍यांचा समावेश होता. अरब आणि मुसलमान देशांमधील वर्तमानपत्रांत भारताविरोधात लेख लिहिण्यात आले होते. भारताचे मित्रराष्ट्र असणार्‍या नेपाळ, श्रीलंका या देशांमध्येही हे अपप्रचार अभियान राबविण्यात आले. या लेखातून पाकिस्तानात जितका दहशतवाद सुरू आहे त्यापेक्षा कित्येकपट अधिक अत्याचार व हिंसाचार भारतीय सरकार आणि सैन्य हे काश्मीर, माओग्रस्त भागात, ईशान्य भारतात किंवा इतर भागांत करत आहेत, त्यामुळे तिथे राहणार्‍या  जनतेला अत्यंत त्रास होत आहे.
 
 
बदलत्या काळात युद्धनीती बदलत चालली आहे. शत्रूशी केवळ सीमेवर सैन्य तैनात करून युद्ध लढण्यापेक्षा अन्य मार्गांनी शत्रूला खिळखिळे करण्याचे डावपेच सध्या जगभरातील देश आखत आहेत. पाकिस्तानने चीनच्या मदतीने अशाच प्रकारे भारताला जागतिक स्तरावर बदनाम करण्याचे षड्यंत्र आखले आहे. विविध माध्यमांचा, इंटरनेटचा वापर करून भारताविरुद्ध अपप्रचाराची मोहीम हाती घेतली आहे. या कारस्थानाला ‘ऑपरेशन्स स्मिअर’ असे नाव देण्यात आले आहे. काय आहे हे प्रकरण ? भारताने त्याला कसा शह दिला पाहिजे ?
 
जम्मू-काश्मीरच्या पुलवामात नुकतेच सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यंदाच्या वर्षात आतापर्यंत ११९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. सुरक्षा दलांनी पुलवामात ‘लष्कर-ए-तोयबा’चा कमांडर अबू दुजानाला ठार केले. दुजानाचे नाव मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यांच्या यादीत होते. त्यामुळे त्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आल्याने ‘लष्कर-ए-तोयबा’ला मोठा हादरा बसला आहे.
 
कोणीही सुरक्षित नाही
गेल्या तीन वर्षांमध्ये भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर परराष्ट्र धोरणामध्ये बर्‍यापैकी यश मिळत आहे. यामुळे भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढला आहे. भारताची प्रतिमा एक लष्करी ताकद व सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर येत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरचा मुद्दा चर्चेत ठेवून भारताला यासंदर्भात वाटाघाटी करण्यास भाग पाडण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना पूर्णपणे अपयश मिळत आहे. सध्याचे भारत सरकार काश्मीर प्रश्‍नाबाबत कोणतीही सवलत देणार नाही, हे पाकिस्तानच्या आता लक्षात आलेले आहे. म्हणून त्यांनी भारताविरोधात माध्यमांमधून आणि सोशल मीडियातून बदनामी करण्यासाठी एक मोठे अभियान सुरू केले आहे. त्याचे नाव ऑपरेशन स्मिअर. या अभियानाचा मुख्य उद्देश भारतात दलित, बायका, मुले, मुसलमान समाज आणि इतर दुर्बल वर्गातील लोकांवर अत्याचार होत आहेत, त्यांच्या धर्मस्थळांवर हल्ले होत आहेत, त्यांना मारले जात आहे, असे चित्र उभे करणे हा आहे. थोडक्यात, भारत हा असा देश आहे की, जिथे कोणीही सुरक्षित नाही, असे चित्र जगापुढे उभे करण्यासाठी हे ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे.
 
अमेरिका, युरोप आणि इतर महत्त्वाच्या देशांत भारतविरोधी दुष्प्रचार
असा दुष्प्रचार करण्यासाठी प्रचंड प्रमाणात आर्थिक ताकद लागणार होती. पाकिस्तान आणि ‘आयएसआय’ने चीनची मदत घेऊन, तसेच मध्य-पूर्वेतील वहाबी उग्रवादी विचारसरणीचा प्रभाव ज्या संस्थांना जगात वाढवायचा आहे, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर निधी गोळा करून पैशाचा स्रोत तयार केला. याचा वापर करून भारताविरुद्ध अमेरिका, युरोप आणि इतर महत्त्वाच्या देशांत भारताविरोधात अपप्रचार करण्यास सुरुवात झाली. जगभरातील प्रसिद्ध वर्तमानपत्रांमधून यासंदर्भात लेख प्रसिद्ध करण्यात येऊ लागले. उदाहरणार्थ, अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट, तसेच युरोप आणि इतर राष्ट्रांमधील महत्त्वाच्या वर्तमानपत्रांत भारतविरोधी दुष्प्रचार सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिका भेट झाली. सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला फार महत्त्व देऊ नये, अशी पाकिस्तानची अपेक्षा होती. तसे झाल्यास काश्मीर प्रश्‍न पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर आला असता; परंतु तसे काही झाले नाही. इतका अपप्रचार करूनही भारत-अमेरिका संबंध हे घनिष्ठ झाले आहेत. अमेरिकेच्या संरक्षण अर्थसंकल्पात भारताला संरक्षणविषयक मदत करण्याविषयीचा एक कायदा पास करण्यात आल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. यामुळे काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि संवेदनशील तंत्रज्ञान अमेरिका भारताला देणार आहे. 
 
 
भारताविरोधात दुष्प्रचार करण्यासाठी अनेक तज्ज्ञांना विकत घेतले गेले. यामध्ये भारताविरोधात लेख लिहून भारताला बदनाम करणार्‍यांचा समावेश होता. अरब आणि मुसलमान देशांमधील वर्तमानपत्रांत भारताविरोधात लेख लिहिण्यात आले होते. भारताचे मित्रराष्ट्र असणार्‍या नेपाळ, श्रीलंका या देशांमध्येही हे अपप्रचार अभियान राबविण्यात आले. या लेखातून पाकिस्तानात जितका दहशतवाद सुरू आहे त्यापेक्षा कित्येकपट अधिक अत्याचार व हिंसाचार भारतीय सरकार आणि सैन्य हे काश्मीर, माओग्रस्त भागात, ईशान्य भारतात किंवा इतर भागांत करत आहेत, त्यामुळे तिथे राहणार्‍या जनतेला अत्यंत त्रास होत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी भारतामध्ये घडणार्‍या कुठल्याही छोट्या प्रसंगाला अतिशय मोठे महत्त्व देण्यात येते. आजही हे सारे सुरू आहे. यामध्ये काही राजकीय पक्षांचाही वापर करण्यात येत आहे.
 
भारतात सर्वत्र अत्याचार
अमेरिकेतील काही संस्थांचा, काश्मीरमध्ये कसे अत्याचार, अन्याय होतो आहे, हे दाखविण्यासाठी वापर केला जात आहे. कॅनडातील संस्थांचा वापर करून, शिखांवर कसा अन्याय होतो आहे, हे दाखवून खलिस्तान निर्मितीची गरज असल्याचे दाखविण्यात येत आहे. त्याचबरोबर युरोपातील काही संस्थांचा वापर ख्रिश्‍चन धर्मियांवर कसे हल्ले होत आहेत यासाठी करण्यात येतो. इंग्लंडमधील काही संस्थांचा वापर हा भारतात स्त्रियांवर, मुलांवर कसे अत्याचार होतात, त्यांचा व्यापार कसा सुरू आहे, हजारो महिला आणि मुली गायब होतात, त्यांचा पत्ता लागत नाही, असे चित्र निर्माण करण्यासाठी होतो. 
 
एवढेच नव्हे, तर व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, ङ्गेसबुक याचा वापरही भारताविरोधात करण्यात येतो. भारतात माध्यमांना बोलण्याचा अधिकार नाही, त्यांच्यावर अन्याय होतो आहे, असे चित्र उभे करण्यात येते. भारतातील माध्यमांवरील सरकारच्या अन्यायाच्या कथा प्रकाशित करण्यात येतात; मात्र इतके करूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला एकटे पाडणे शक्य झालेले नाही. मात्र, पाकिस्तानविरोधात जग एकत्रित झाले असून पाकपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा जगमान्य झाला आहे. त्यामुळेच आता पाकिस्तानचा चीनच्या मदतीने ऑपरेशन स्मिअरची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर आतापर्यंत २१५ कोटी डॉलर्स खर्च झाले आहेत. २०१९ च्या निवडणुकांआधी हजारो कोटी डॉलर्स ‘ऑपरेशन स्मिअर’वर खर्च होतील. उद्देश एकच, भारताला बदनाम करत राहणे. इतक्यावर हे सर्व थांबलेले नाही. काही हिंदू संघटनांमधील व्यक्तींना हिंसाचार करण्यासाठी पैसे देण्यात आले आहेत, अशापण बातम्या आहेत.
 
चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून चीनला धडा शिकवा
चिनी माध्यमांतून भारताविरोधात लेख लिहिले जात आहेत आणि भारताला धमकावले जात आहे. १९६२ युद्धाची कटू आठवण, चीनचे लष्कर बलाढ्य सामर्थ्यशाली आहे, अशा गोष्टी सांगितल्या जात आहेत. चिनीप्रेमी तज्ज्ञांचा वापर करून युद्ध झाल्यास भारताचा कसा पराभव होईल, हे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे, तर भारतातील काही तज्ज्ञांचा वापर चीनची ताकद किती जास्त हे सांगण्यासाठी केला जात आहे. भारतातील अनेक तज्ज्ञ आपले सैन्य भूतान सीमेवरून मागे घ्यावे, असे भारताला सल्ले देत आहेत. चीनशी लढणे भारताला शक्य नाही, असाही अपप्रचार केला जात आहे.
 
या अपप्रचाराच्या युद्धात भारताचे रक्षण कसे करायचे हे पाहणे महत्त्वाचे आहे. याबाबत अनेक उपाय आहेत; पण चीनविरोधात एक महत्त्चाचा उपाय पुरेसा वापरला जात नाही. त्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. हा उपाय आहे बहिष्काराचा. यासाठी भारत-चीन व्यापाराचा एक शस्त्र म्हणून वापर केला पाहिजे. चीनमधून भारताला होणारी आयात ही चीनला होणार्‍या निर्यातीच्या पाचपट आहे. निर्यातीचा ङ्गायदा चीनला होत असल्याने त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात भारतीय नागरिक मदत करतात. त्यामुळे चिनी सैन्याची ताकद वाढविण्यास आपणच मदत करतो. भारतीयांनी चिनी वस्तू विकत घेतल्याने त्याचा ङ्गायदा चीनची आर्थिक ताकद वाढण्यात होतो. लष्करी ताकद वाढण्यात होतो. याचा वापर भारताविरोधात केला जाऊ शकतो.
 
भारतात आता सणांचा काळ येत आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणासुदीच्या काळात चिनी वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यंदाच्या वर्षी सर्वसामान्य नागरिकांना चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून देशी बनावटीच्या वस्तू विकत घेण्याबाबत आवाहन करणे गरजेचे आहे. त्यामुळे चीनकडून भारताला होणारी निर्यात ३० ते ४० टक्के कमी केली जाऊ शकते. शक्य आहे तिथे चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे. भारत सरकारने ‘जीएसटी’ कर लागू करण्यासारखे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यामध्ये चीनमधून होणार्‍या आयातीवर १६ टक्के कर लावला जात आहे. म्हणजे कुठलीही चिनी वस्तू भारतात आल्यास त्यावर १६ टक्के कर लावला जाईल, तसेच ज्या वस्तू अतिप्रमाणात येत आहेत, त्यावर ऍण्टी डम्पिग टॅक्स हा आणखी सहा टक्के कर लावला जात आहे. त्यामुळे ती वस्तू भारतात आल्यावर २२ टक्के करपात्र वस्तू होईल. त्यामुळे भारतीय लघु आणि मध्यम उद्योग चिनी मालाशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज होतील. याशिवाय चीनने चालविलेले आर्थिक युद्ध जिंकण्यासाठी इतरही काही उपाय करावे लागतील; आपण सर्व देशवासीय देशप्रिय नागरिक म्हणून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून चीनला धडा शिकवू शकतो. बहिष्कार घातल्यास चीनचे आर्थिक नुकसान होणार आहे. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळायला हवा. 
 
भारताने अजून काय करायला हवे?
दुष्प्रचार करणारी चार वर्तमानपत्रे १०,००० शत्रू सैनिकांपेक्षा जास्त धोकादायक असतात, असे प्रसिद्ध सेनापती नेपोलियनने म्हटले होते. युद्ध झाल्यास स्वसंरक्षण करण्यास देश समर्थ आहे; परंतु युद्ध न करता देशांतर्गत होणार्‍या अपप्रचाराचा मुकाबला आपण कसा करणार, हा सध्याचा कळीचा प्रश्‍न आहे. सरकारने आपल्या गुप्तचर संस्था, पोलीस आणि इतर संस्था यांचा वापर करून अशा कोणत्या संस्थांना पाकिस्तानकडून पैसा मिळाला आहे का, याची चौकशी सुरू करणे आणि त्यांच्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. याशिवाय अनेक संस्था व व्यक्तींना असा पैसा मिळाला असण्याची शक्यता आहे, त्यांचीही चौकशी व्हायला हवी. चौकशी करून त्यांच्याविरुद्ध भारतीय कायद्यांतर्गत योग्य शिक्षा देणे गरजेचे आहे.
 
 - (नि.) ब्रि. हेमंत महाजन