जिल्हा बँकांमधून पिक कर्जाचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी

    दिनांक  06-Aug-2017


बुलडाणा : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन हे नेहमीच तत्पर असून राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत देण्यात येणारे १० हजार रुपयांचे पिक कर्ज जिल्हा बँकांमधून तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचे मोठ्या प्रमाणत फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडकर यांनी केले आहे.


जिल्हा बँकेच्या सभागृहात पीक कर्ज वाटप शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. याप्रंसगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, सर्व मुख्याधिकारी, विभागीय अधिकारी, चिखली येथील संस्थेचे अध्यक्ष, सचिव व लाभार्थी शेतकरी सभासद उपस्थित होते.


जिल्हा सहकारी बँकांकडून ३० जून २०१६ रोजीपर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकरी सभासदांना खरीप पिक पेरणीसाठी १० हजार रूपयांपर्यंत तातडीने पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. यासाठी १४ व २० जून २०१७ च्या शासन निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना खरीप पिक पेरणीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांनी बँकांच्या शाखेमध्ये सादर करून १० हजार रूपयांच्या मर्यादेपर्यंत तातडीने कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

तसेच पात्र शेतकरी सभासदांनी स्वयंघोषीत शपथपत्र, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीसाठी पात्र सभासदांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची पावती, शेतकऱ्यांचा सातबारा, गाव नमुना ८ –अ, कलम ४८ अंतर्गत घोषणापत्र, मोबाईल क्रमांक नमूद करून स्वत:च्या सहीने प्रमाणीत केलेल्या आधार कार्डची छायांकित प्रत, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड असल्यास त्याची छायांकित प्रत, रेशन कार्डची छायांकित प्रत, बँकेचा विहीत नमुन्यातील किसान क्रेडीट कार्डचा अर्ज, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र ही कागदपत्रे अर्जसह बँकेत सादर करावीत असे देखील पुलकुंडकर यांनी सांगितले.