जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने...

    दिनांक  05-Aug-2017   
 

 
असे म्हणतात की, ’गर्भवती स्त्री प्रसूत झाल्यानंतर आपल्या गोड गोजिर्‍या इवल्याशा बाळाला जवळ घेऊन जेव्हा प्रथम स्तनपान देते आणि बाळही आनंदाने स्तनपान करते, तेव्हा तो तिचा आनंद जगातील सर्व सुखांपेक्षा मोठा असतो. प्रसूतीवेदना, गर्भावस्थेतील त्रास या सर्वांचा त्या एका क्षणात जणू काही तिला विसर पडतो आणि प्रेमाने पान्हा फुटतो. बाळ जन्मल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपान देणे हे बाळ आणि आईच्याही फायद्याचे असते, परंतु समाजात स्तनपानाबाबत अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. याच पार्श्वभूमीवर स्तनपानाचे महत्त्व कळावे, यासाठी जगभरातील विविध देशांत महिलांमध्ये जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. भारतातही सरकारतर्फे ’जागतिक स्तनपान सप्ताह’ १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत साजरा केला जातो. या काळात विविध सामाजिक आणि आरोग्य संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर्स स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करतात.
 
आधुनिक वैद्यकशास्त्राने आईच्या दुधाची महती वेळोवेळी संशोधनाअंती स्पष्ट केली आहे. आईचे दूध बाळासाठी अमृतच असते. तोच बाळाचा सर्वोत्तम आहार असतो. बाळाच्या वाढीत आईच्या दुधातील सहज पचणारी प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे यांचे महत्त्वाचे स्थान असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ नेहमीच सांगतात.
 
बाळ जन्मल्यानंतर पहिला स्त्राव (चिक) किंवा कोलोस्ट्रोम बाळासाठी अत्यंत उपयुक्त असतो, परंतु त्याबाबतही अनेक गैरसमज पाळले जातात. कोलोस्ट्रोमऐवजी मध अथवा अन्य पदार्थांची मात्रा नवजात बाळाला चाटवली जाते आणि तो चिक काढून टाकून दिला जातो. परंतु, बाळाला हे कोलोस्ट्रोम पाजणे म्हणजेच त्याचे नैसर्गिक लसीकरण करणे होय. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्याची पचनसंस्था सुधारून बाळाच्या शरीरात सुरक्षित विविध आजार-रोगांच्या संक्रमणविरोधी वातावरण निर्माण करते. आईच्या दुधामुळे बालकाचे ऍलर्जी, अतिसार, विषाणू संसर्ग आदींपासून संरक्षण होते, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या महाव्यवस्थापक डॉ. तेड्रॉस अधानॉमघेब्रेसस यांनी म्हटले आहे. त्यामुळेच बालकास सहा महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपानच करण्याचा आणि त्यानंतर बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत आईचे दूध द्यायलाच हवे.
 
बाळ आईच्या दुधाने सुदृढ तर होतेच, परंतु त्याचा लाभ शेवटी राष्ट्रालाही होतो. कारण, आज जन्म घेणारी बालके हीच भविष्यातील राष्ट्राची नागरिक असतात. तीच या विशाल अशा राष्ट्रपुरुषाचे प्रतिनिधित्व करणार असतात. त्यामुळे या ’जागतिक स्तनपान सप्ताहा’ निमित्त मातांनी आणि कुटुंबीयांनी स्तनपानाचे महत्त्व ओळखून घरातीलच नव्हे, तर परिसरातील लोकांमध्येही याबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक ठरते.
 
स्तनपान आवश्यक
'निसेफ’ आणि ‘जागतिक आरोग्य संघटने’ने ’जागतिक स्तनपान सप्ताहा’ निमित्त जारी केलेल्या एका आकडेवारीनुसार, भारतातील ५० टक्क्यांहूनही कमी नवजात बालकांना जन्मल्यानंतर एका तासात स्तनपान दिल्याची माहिती समोर आली आहे. तर नवजात बालकांना सहा महिन्यांपर्यंत स्तनपान देण्याची भारतातील आकडेवारी ५५ टक्के आहे. भारतातील केवळ ४२ टक्के बालकांना जन्मल्यानंतर एका तासाच्या आत मातेचे दूध पाजले जाते. या आकडेवारीनुसार, श्रीलंकेत ८० टक्के, तर बांगलादेशात ५१ टक्के आणि इंडोनेशियात ४९ टक्के नवजात बालकांना एका तासाच्या आत मातेचे दूध पाजले जाते, जे प्रमाण भारतापेक्षाही अधिक आहे. चीनमध्ये ४१ टक्के आणि पाकिस्तानात १८ टक्के नवजात बालकांना जन्मल्यानंतर एका तासाच्या आत स्तनपान केले जाते. स्तनपानाबाबत असलेल्या अनेक गैरसमजुती, चुकीच्या सवयींमुळे भारताचे प्रतिवर्षी १४ अब्ज डॉलरचे नुकसान होत असल्याचेही या आकडेवारीतून पुढे आले आहे. त्याचबरोबर चीन, भारत, इंडोनेशिया, मेक्सिको, नायजेरिया या पाच देशांतील स्तनपानाबाबत असलेल्या चुकीच्या समजुतींमुळे दरवर्षी २.३६ लाख बालकांचा मृत्यू होत असल्याचे ‘युनिसेफ’ आणि ‘जागतिक आरोग्य संघटने’ने जाहीर केलेल्या अहवालातून उघड झाले आहे, जे खरोखर चिंताजनक म्हणावयास हवे. ‘जागतिक आरोग्य संघटना’ आणि ‘युनिसेफ’ने संयुक्तपणे जारी केलेल्या अहवालात अन्य अनेक बाबाींची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार भारतात प्रत्येक नवजात बालकाच्या जन्मानंतर केवळ ०.१५ डॉलर एवढा खर्च केला जातो, तर नवजात बालकांसाठी सुरक्षित-मैत्रीपूर्ण वातावरण असलेल्या रुग्णालये किंवा प्रसूतीगृहांची संख्या शून्य असल्याचेही ही आकडेवारी सांगते. दुसरीकडे, आईच्या दुधाला पर्याय देण्याचा दावा करणार्‍या अनेक कंपन्या सध्या कार्यरत आहेत. मात्र, भारत सरकारने या विरोधात कठोर पावले उचलत अशा कृत्रिमउत्पादनांची निर्मिती करणार्‍या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागांना दिले आहेत. २००३ मध्ये करण्यात आलेल्या इन्फन्ट मिल्क सबस्टिट्यूटस् कायद्यान्वये अशा पर्यायी दुधाच्या उत्पादनांवर बंदी घातली आहे. मात्र, तरीही या उत्पादनांची जाहिरात करून दिशाभूल करणारी माहिती देऊन नवजात बालकांना तयार दूध पाजावे, यासाठी या कंपन्या भरीस पाडतात, त्याचमुळे केंद्र सरकारने याविरोधात कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे.
 
स्तनपानासंदर्भात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे स्तनदा मातांना सकस आहार उपलब्ध करून देणे. कारण बाळ हे सर्वस्वी आईच्या दुधावरच निर्भर असते. आईने जर पोषक आहार घेतला, तरच बाळाला भरपूर दूध मिळू शकते. जे आईने योग्य आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वयुक्त आहार घेतला तरच तयार होऊ शकते. 
 
- महेश पुराणिक