जिल्हा नियोजन समितीसाठी ८ ऑगस्टला होणार मतदान

    दिनांक  04-Aug-2017बुलडाणा - जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या ८ तारखेला या पदांसाठी मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील एकूण १४ ठिकाणी मतदानकेंद्र उभारण्यात येणार आहे, असे देखील प्रशासनकडून सांगण्यात आले आहे.


विशेष म्हणजे यंदाच्या या निवडणुकांसाठी रंगीत मतपत्रिकांचा वापर करण्यात येणार असून विशिष्ट वर्गासाठी विशिष्ट रंगाच्या मतपत्रिकांचा वापर करण्यात येणार आहे. यात ग्रामीण क्षेत्र जिल्हा परीषद मतदारसंघामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरीता पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असणार आहे. तसेच नागरी क्षेत्र नगर परिषद व नगर पंचायत मतदारसंघामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाकरीता फिका निळा (आकाशी) रंगाची मतपत्रिका, सर्वसाधारण महिला राखीवकरीता फिका हिरव्या रंगाची मतपत्रिका, अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये फिका गुलाबी रंगाची मतपत्रिका असणार आहे. मतदान प्रक्रिया ही पसंतीक्रमानुसार असून पसंतीक्रम १ हा अनिवार्य आहे. पसंतीक्रम १ न दिल्यास सदर मतपत्रिका अवैध ठरणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


तसेच पसंतीक्रम हे केवळ अंकामध्ये नमूद करणे बंधनकारक आहे. शब्दामध्ये दर्शविल्यास सदर मतपत्रिका अवैध ठरणार आहे. तसेच कोणत्याही एका भाषेमध्येच पसंतीक्रम दर्शविणे बंधनकारक राहील. मतदान पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतदान केंद्रावरील मतदान अधिकारी यांच्याकडून पेन पुरविण्यात येणार आहे. त्याच पेनाचा वापर मतदान करण्यासाठी करणे बंधनकारक आहे. अन्य पेनाने केलेले मतदान हे अवैध ठरणार आहे.