आपण कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी गेलो, आणि अंबा घाट, ज्योतिबा, पन्हाळगड, विशाळगडावर फेरफटका मारून आलो नाही, असे क्वचितच होते. पन्हाळगड आणि विशाळगड परिसराचा स्वतःचा असा इतिहास आहे. जो पावनखिंडीने जोडला आहे. विशाळगड हा नावाप्रमाणेच विशाल आणि विस्तीर्ण पसरलेला आहे. विशाळगड हा अंबा घाट आणि कोकण परिसरामधील बंदरे, कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणार्या घाटमार्गावर बांधण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कालीन इतिहासाचा साक्षीदार असलेला विशाळगड आजच्या दिवशी मात्र अवशेषरुपी राहिलेला आहे.
कोल्हापूर बस स्थानकातून विशाळगडावर जाण्यासाठी एस. टी. बस आहेत. कोल्हापूरहून विशाळगडावर पोहचण्यासाठी मलकापूर - पांढरपाणी (पावनखिंड) मार्गे रस्ता आहे. या मार्गाने पावनखिंड पाहून, विशाळगडाकडे जाता येते. तर दुसऱ्या मार्गाने कोल्हापूर – मलकापूर -गजापूर या मार्गे विशाळगडावर पोहचता येते.

विशाळगडाचा इतिहास :
इ. स. ११९० च्या सुमारास राजा भोज ( दुसरा ) याने, त्याच्या राजधानीचे ठिकाण कोल्हापूरहून पन्हाळगडावर नेले. त्यावेळी त्याने घाटमार्गाचे संरक्षण करण्यासाठी परिसरामध्ये काही किल्ले बांधले होते. त्यावेळीच किशागिला म्हणजेच विशाळगड बांधण्यात आला होता. विशाळगडास भोजगड, खिलगिला, खेळणा असेही म्हणतात. त्यानंतर विशाळगड यादवांच्या अधिपत्याखाली आला. पुढे इ. स. १४६९ साली बहामनी सुलतान विशाळगडावर चालून आला. त्यावेळी अथक प्रयत्नानंतर विशाळगड सुलतानाच्या ताब्यात आला.
यानंतर सुमारे दिडशे वर्षांपेक्षा अधिक काळ विशाळगड बहामनी आदिलशाहीकडे होता. इ. स. १६५९ च्या नोव्हेंबर महिन्यात शिवाजी महाराजांनी पन्हाळगड जिंकून घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला म्हणजेच विशाळगड जिंकून घेतला, आणि त्याचे नाव ‘विशाळगड’ असे ठेवले ( विशाळगडाचे त्यावेळी ‘खेळणा’ असे नाव होते ). इ. स. १६६० मध्ये सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता. त्याचवेळी सूर्यराव सूर्वे यांनी विशाळगडाला वेढा घातला होता. पन्हाळगडाचा वेढा फोडून शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचले होते. त्यावेळचा पावनखिंडीमधील बाजी प्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास, आपल्याला माहिती आहेच. आजही काही दुर्गप्रेमी मंडळी पावनखिंडीमार्गे पन्हाळगड ते विशाळगड अशी भ्रमंती करतात.
पुढे संभाजी महाराजांनी विशाळगडावर नवीन बांधकामे केली. इ. स. १७०१ साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या. इ. स. १७०७ साली महाराणी ताराबाई यांनी विशाळगड जिंकून घेतला. शेवटी इ. स. १८४४ साली इंग्रजांच्या आधिपत्याखालील इस्ट इंडिया कंपनीने विशाळगड जिंकून घेतला, आणि त्यावरील बांधकामे पाडून टाकली.
विशाळगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
विशाळगडावर जातानाची दरी : विशाळगडाच्या पायथ्याशी असलेला वहानतळ आणि गडाच्या दरम्यान एक दरी आहे. पूर्वी या दरीमध्ये उतरुन विशाळगडावर जावे लागत असे. परंतू आता या दरीवरून गडावर जाण्यासाठी एक लोखंडी पूल बांधण्यात आलेला आहे. या पूलावरुन विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर गडावर जाण्यासाठी वाटा आहेत.

विशाळगडावरील हजरत मलिक रेहान दर्गा : गडावर जाण्यासाठी शिडीच्या वाटेने गेल्यानंतर समोर दर्गा दिसतो. विशाळगडावरील हा दर्गा सर्व धर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गडावरील या दर्ग्याच्या परिसरात काही हॉटेल्स देखील आहेत. दर्ग्याच्या उरूसवेळी विशाळगडावर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
अमृतेश्वर मंदिर आणि पाताळदरी : अमृतेश्वर मंदिर दर्ग्यापासून जवळ आहे. अमृतेश्वर मंदिरामध्ये पंचाननाची मुर्ती आहे. मंदिरापासून पुढे गेल्यानंतर खाली पाताळदरीमध्ये उतरता येते. या ठिकाणी ओढा आहे. या ओढ्याच्या दुसऱ्या बाजुस वीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे यांच्या समाध्या आहेत.
भगवंतेश्वर मंदिर : दर्ग्यापासून भगवंतेश्वर मंदिराकडे येण्यासाठी एक वाट आहे. भगवंतेश्वर मंदिराशेजारी विठ्ठल मंदिर आणि गणपतीचे मंदिर आहे. मंदिरासमोर पाण्याची विहीर आहे. या ठिकाणी मोडी लिपीमध्ये कोरलेला एक शिलालेख आहे.
पंतप्रतिनीधींचा वाडा (राजवाडा) : भगवंतेश्वर मंदिरापासून जवळच असलेल्या पंतप्रतिनीधींच्या वाड्याकडे (राजवाड्याकडे) जाता येते. प्रवेशद्वारासह राजवाड्याच्या प्रचंड पडझड झालेली आहे. राजवाड्यापासून मागील बाजूने आपण पुढे गेल्यानंतर टकमक टोकाजवळ येवून पोहचतो.
रणमंडळ टेकडी : गडावरून परतीच्या वाटेने दर्ग्याकडे येत असताना, मुंढा दरवाज्यापासून ‘रणमंडळ’ टेकडीकडे जाता येते. या टेकडीजवळच एक तोफ आहे. या वाटेवर छत्रपती राजाराम महाराजांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई यांची समाधी देखील आहे. समाधी स्थळावर दगडावर कोरलेल्या पादुका आहेत. याशिवाय विशाळगडावर पाहण्यासारखे मुचकुंदाच्या गुहा, सती, तास टेकडी, जवळच असलेला पन्हाळगड आणि अंबा घाट ही ठिकाणे आहेत.
परंतु अनेक ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार असलेला तसेच काही काळ राजधानीचा दर्जा लाभलेला विशाळगड, आजच्या दिवशी विजीर्ण अवस्थेत आहे. मलिक रेहानच्या दर्ग्याशिवाय एकही वास्तू सुस्थिती नाही. इतिहासामध्ये वेळ प्रसंगी बलिदान देवून आपल्या पूर्वजांनी विशाळगड राखण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक ठिकाणी असलेल्या वास्तूंचे महत्त्व लक्षात घेता, या वास्तूंचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे. इतिहासाचा वारसा लाभलेला पन्हाळगड पहाणे ही दुर्ग भ्रमंती करणाऱ्या दुर्ग प्रेमींसाठी निश्चितच एकप्रकारे पर्वणीच आहे.
– नागेश कुलकर्णी