दुर्ग भ्रमंती - नळदुर्ग

26 Aug 2017 16:42:46


 

भारताच्या इतिहासात महत्वाचे स्थान असलेल्या महाराष्ट्र राज्यात भुईकोट किल्ले, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग असे तिन्ही प्रकारातील किल्ले आढळतात. त्यामध्ये भुईकोट प्रकारातील काही किल्ले मराठवाड्यात आहेत. नांदेड, अंबाजोगाई, धारूर, औसा, नळदुर्ग या परिसरात हे किल्ले आपल्याला दिसून येतात. इतिहासामधील नोंदीनुसार असलेल्या व्यापारीमार्गांवर किंवा व्यापारी मार्गांच्या परिसरात या भुईकोट किल्ल्यांची बांधणी करण्यात आलेली असल्याचे आढळून येते. यापैकीच एक असलेल्या नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्याची भ्रमंती आपण आज करणार आहोत.

उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यात असलेला नळदुर्गचा किल्ला हा महाराष्ट्रात असलेल्या भुदुर्गांपैकी सर्वात मोठा किल्ला आहे. सोलापूरपासून नळदुर्गचा किल्ला ५० कि. मी. अंतरावर आहे. सोलापूर -हैदराबाद रस्त्यावर नळदुर्ग गावामध्ये हा किल्ला आहे. तसेच तुळजापूर आणि उस्मानाबाद (धाराशिव) पासून देखील नळदुर्गला जाण्यासाठी रस्ता आहे. नळदुर्ग या गावामध्ये सर्वात मोठा भुईकोट किल्ला तसेच एक खंडोबाचे मंदिर देखील आहे.

 

नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास :

नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास सांगत असताना नळ राजा आणि दमयंती राणीचा इतिहास सांगितला जातो. हा किल्ला काही काळ ‘चालुक्य’ राजाकडे होता. पुढे तो बहामनी सुलतानांच्या ताब्यामध्ये आला. त्यानंतर हा किल्ला विजापूरची आदिलशाही, मुघलशाही आणि निजामशाही यांच्याकडे आला. किल्ल्याचे बांधकाम आदिलशाहीच्या कालावधीत करण्यात आले.

 

नळदुर्ग किल्ल्यावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

किल्ल्याचे खंदक : एखादा किल्ला जमिनीवर किंवा सपाट भू भागावर उभारलेला असेल तर त्याला संरक्षक म्हणून खंदक असावा लागतो. तसे खंदक या किल्ल्याच्या सभोवती आहेत. या ठिकाणी बोरी नदीचे पात्र वळवून त्याचा खंदक म्हणून उपयोग केला आहे. यामुळे किल्ला आपोआपच संरक्षित झाला आहे.

 

किल्ल्याचे प्रवेशद्वार : नळदुर्ग गावातून किल्ल्याकडे जाणार्‍या वाटेने जात असताना खंदकावर उभारण्यात आलेल्या पुलावरून किल्ल्याकडे जाता येते. किल्ल्याच्या परिसरात आल्यानंतर काही अंतर चालून गेल्यानंतर पुढे किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. सध्या हा किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस बुरुजामध्ये काही खोल्या आहेत. प्रवेशदारामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर किल्ल्याच्या बुरुजांवर जाता येते.

 

किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज : नळदुर्ग किल्ल्याची तटबंदी ३ किमी लांबीची आहे. किल्ल्याच्या परिसरात तटबंदीवर शंभरपेक्षा जास्त बांधलेले बुरुज आहेत. या ठिकाणी बांधण्यात आलेले बुरुज षटकोनी, पंचकोनी, चौकोनी, अर्धवर्तुळाकार आकारात आहेत.

 

रणमंडळ : नळदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस एक किल्ला बांधलेला आहे. या किल्ल्यास ‘रणमंडळ’ असे म्हणतात.

 

हत्तीखाना, किल्लेदाराचा वाडा आणि परिसर : किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर परिसरामध्ये तोफा पडलेल्या दिसतात. याच ठिकाणी हत्तीखान्याची इमारत आहे. थोडे अंतर चालून हत्तीखान्याच्या मागील बाजूस गेल्यानंतर किल्लेदाराचा वाडा आहे. या वाड्यामध्ये काही शिल्प आहेत. या वाड्याच्या बाजूला ‘मुन्सीफ कोर्टची‘ इमारत आहे.

 

जामा मशीद : किल्लेदाराच्या वाड्याच्या एका बाजूस ‘जामा मशीद‘ आहे. किल्लेदाराच्या वाड्याच्या परिसरात, जामा मशिदीशेजारी हौद आहे. या ठिकणी लोकवस्ती आहे.

 

नऊ पाकळ्यांचा बुरुज किंवा नवबुरुज : किल्लेदाराच्या वाड्याच्या एका बाजूस उभा असलेला एक उंच बुरुज आपल्याला दिसतो. किल्ल्याच्या आतील बाजूने या बुरुजाचा आकार लक्षात येत नाही. परंतु किल्ल्याच्या बाहेरील बाजूने पाहिल्यानंतर, हा बुरुज कमळाच्या पाकळ्यांसारखा दिसतो. या बुरुजास “नऊ पाकळ्यांचा बुरुज” किंवा ‘नवबुरुज‘ असे म्हणतात. किल्ल्याच्या आतील बाजूने पाहिल्यानंतर, असे दिसते की, हा बुरुज दोन मजली आहे.

 

बारदरी : बारदरी नावाची पडक्या अवस्थेतील इमारत नळदुर्ग किल्ल्याच्या परिसरात, जामा मशिदीच्या मागील बाजूस, तटबंदीजवळ आहे. या इमारतीमधून किल्ल्याच्या खंदकाच्या स्वरुपात वाहणाऱ्या बोरी नदीचे पात्र आणि नदीवर असणारा बंधारा दिसतो.

 

रंग महाल :  बारदरीच्या जवळच अवशेष स्वरुपात असलेली, एक इमारत याठिकाणी आहे. या इमारतीस ‘रंग महाल’ असे म्हणतात. नळदुर्गच्या या किल्ल्यावर इतरही काही पडक्या इमारती आणि वाड्यांचे अवशेष आहेत.

 

पाणी महाल : नळदुर्ग किल्ल्याच्या परिसरातील सर्वात आकर्षणाचे केंद्र म्हणजे ‘पाणी महाल’ हे ठिकाण होय. पर्यटक या ठिकाणी विशेष गर्दी करतात. किल्ल्यासाठी खंदक म्हणून बोरी नदीचा वापर करण्यात आलेला आहे. नदीचे पात्र वळवून किल्ल्यास खंदक तयार करण्यात आलेला आहे. या खंदकावरच दुसर्‍या आदिलशहाच्या काळात एक बंधारा बांधलेला आहे. या बंधार्‍याच्या एका बाजूस नळदुर्ग तर दुसर्‍या बाजूस किल्ल्याचा रणमंडळ आहे. या बंधार्‍याच्या आतमध्ये एक छोटा राजवाडा बांधलेला आहे. बंधाऱ्याच्या आतील बाजूस असलेल्या राजवाड्यामध्ये उतरण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत.

पावसाळ्यामध्ये पाणी महाल पाहण्यासाठी पर्यटक जास्त गर्दी करतात. पावसाळ्यामध्ये खंदकावरील बंधारा पूर्ण भरल्यानंतर पाणी ह्या बंधार्‍यावरुन वाहते, परंतु आतील बाजूस असलेल्या राजवाड्यामध्ये याचे पाणी जात नाही.

 

उपळ्या बुरुज : नळदुर्गच्या किल्ल्याचा परिसर खूप मोठा असल्यामुळे, या किल्ल्याच्या परिसरात फेरफटका मारण्यास खूप वेळ लागतो. याठिकाणी आज इतर ही काही इमारती आहेत. त्यामधील एक आकर्षक वास्तू म्हणजे ‘उपळ्या बुरुज’. या बुरुजास ‘उपली बुरुज’ किंवा ‘टेहळणी बुरुज’ असेही म्हणतात. हा टेहळणी बुरुज किल्ल्याच्या दोन तटबंदीच्या मध्यभागी आहे. या टेहळणी बुरुजावर तोफा ठेवलेल्या आहेत. या बुरुजावरुन संपूर्ण किल्ल्याचा आणि सभोवतीचा परिसर दिसतो.

पुणे परिसरात अनेक गिरीदुर्ग आहेत. आपण आजवर काही गिरीदुर्गांवर भ्रमंती सुद्धा केलेली असेल, परंतु महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भूदुर्गावर भ्रमंती करण्याचा योग आलेला नसेल, तर नळदुर्गच्या या किल्ल्यावर एकदा तरी सैर करून या, नक्कीच एक वेगळा अनुभव असेल.

 

– नागेश कुलकर्णी

Powered By Sangraha 9.0