बांधकाम कामगारांना देखील मिळणार महात्मा फुले जनआरोग्य सेवेचा लाभ

    दिनांक  25-Aug-2017बुलडाणा - महाराष्ट्र बांधकाम तसेच इतर कामगार कल्याणकारी मंडळांमध्ये नोंदणी असलेल्या राज्यातील बांधकाम कामगारांना व त्याच्या कुटुंबियांना देखील आता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे संरक्षण मिळणार आहे. कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी असलेल्या सर्व कामगारांचा समावेश या योजनेत करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटूंबीयांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे.


कामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम कामगारांना देण्यात येणारे नोंदणी प्रमाणपत्र हे या योजनेतून मिळणाऱ्या विमा संरक्षणासाठी पुरावा समजण्यात येणार आहे. शासनाने निश्चित केलेली देय विमा हप्त्याची रक्कम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगार कल्याणासाठी गोळा करण्यात येत असलेल्या सेसमधून अदा करण्यात येणार आहे. या मंडळाच्या निधीतून नोंदीत कामगारांसाठी सध्या सुरू असलेल्या समान स्वरूपाच्या अन्य योजनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सदर योजना कामगार विभागामार्फत बंद करण्यात येणार आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत दारिद्र्य रेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक व केशरी शिधापत्रिकाधारक कुटूंबांचा विमा हप्ता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विमा कंपनीस नियमित अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे आता नोंदणी केलेल्या कामगारांना दुर्धर आजारांमध्ये या योजनेचा लाभ मिळणार आहे.