विकासकामांच्या निधीच्या परिपूर्ण वापर करा - फुंडकर

    दिनांक  25-Aug-2017


बुलढाणा : जिल्ह्यातील विकासकामांसाठी देण्यात आलेल्या निधीचा पुरेपूर वापर केला जावा, जिल्हा प्रशासनाच्या कोणत्याही विभागाने आपला निधी अखर्चीत ठेवून समर्पित करू नये. निधी खर्च करण्याचे व्यवस्थित नियोजन करून जिल्ह्यातील विकासकामे नियोजित वेळेतच पूर्ण करावीत, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन आज जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.


याच बरोबर शेतकरी कृषी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यासाठी यापुढे महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात यावे असे देखील ते म्हणाले. कर्ज माफीचे अर्ज भरण्यासाठी शासनाने मुद्दतवाढ दिलेली आहे. त्यामुळे या शिबिरांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळवून द्यावा. याच बरोबर या कर्जमाफी योजनेमुळे सर्वात जास्त लाभ बँकांना होणार आहे. त्यामुळे बँकांनी स्वत: पुढाकार घेवून शेतकऱ्यांचे कर्जमाफी अर्जासाठी लागणारे बँकेतील कागदपत्रे ताबडतोब द्यावीत. तसेच अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून मदत करावी. कर्जमाफीचा अर्ज भरताना पती, पत्नी किंवा मुलगा असे शेतकरी कुटूंब गृहीत धरण्यात आले होते. त्यामुळे पती-पत्नी या दोघांचे आधार कार्ड आवश्यक असायचे. आता मात्र ज्याच्या नावावर ७/१२ व कर्ज खाते आहे. अशांना या योजनेचा फायदा होणार आहे, असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कृषी, सहकार व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या शिबिरांमध्ये उपस्थित राहून जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घ्यावेत, असे देखील ते म्हणाले.