महाराष्ट्र मिशन १ मिलियनमध्ये बुलडाणा जिल्हा विदर्भात प्रथम

    दिनांक  24-Aug-2017


बुलडाणा : फेडरेशन इंटरनॅशनल ऑफ फुटबॉल असोसिएशनकडून (फिफा) भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र मिशन १ मिलियन' या उपक्रमात विदर्भातून बुलढाणा जिल्हा प्रथम आला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात बुलढाणा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. तसेच हे अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे पार पडावे, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून विशेष नियोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी दिली आहे.


क्रिकेट बरोबरच फुटबॉल या क्रीडा प्रकारात देखील भारताने दर्जेदार कामगिरी करावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटबॉल या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी सर्व राज्य सरकारांना आवाहन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर महराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून राज्यात फुटबॉल या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी 'महाराष्ट्र मिशन १ मिलियन' अर्थात 'अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय' हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामार्फत राज्यातील सर्व शाळांना आपल्याकडे असलेल्या फुटबॉल या खेळाच्या सुविधा व शाळेबाबत माहिती ऑनलाईन सादर करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. तसेच या माहितीच्या आधारावर राज्यातील शाळांना फुटबॉल या खेळासाठी आवश्यक साहित्य राज्य सरकारकडून पुरवण्यात येणार होते.

यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे नियोजन, त्यास जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व फुटबॉल संघटनेचे सहकार्य यामुळे जिल्ह्यातील जवळजवळ ९० टक्के शाळांनी पुढाकार घेवून सदर माहिती शासनाने दिलेल्या लींकवर ऑनलाईन सादर केली. तसेच तालुका व जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत हिरीरीने सहभाग नोंदविला. या सर्व गोष्टींमुळे विदर्भातून बुलढाणा जिल्हा प्रथम क्रमांकावर तर संपूर्ण राज्यातून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी बुलडाणा जिल्ह्याच्या या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.