हरतालिका

    दिनांक  23-Aug-2017   


गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी, स्त्रियांनी “हरतालिकेची” व्रत करायची रीत आहे. पुराण काळी, पार्वतीने शंकर पती मिळावा म्हणून खडतर तपश्चर्या केली. उपवास केले. केवळ पर्ण म्हणजे पाने खाऊन राहिली. नंतर तर पर्ण ग्रहण करणे सुद्धा सोडले व ती ‘अपर्णा’ झाली. आपल्या तपस्येने, गुणांनी तिने शंकराचे मन जिंकले. ती शंकराची जीवा-भावाची मैत्रीण झाली. इतके की तिच्या वाचून शंकराचे पान हलत नसे. आणि त्याही पलीकडे जाऊन, पार्वती त्याच्या गळ्यातला ताईत झाली. तालिका झाली! हर-तालिका!

शंकर – पार्वतीची ही कथा देव आणि भक्ताची कथा आहे. “तयाते मी माथा मुकुट करी” - माझ्या भक्ताला मी मुकुटाप्रमाणे मस्तकी धारण करतो, असे कृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे, शंकराने पार्वतीला ताईत म्हणून बांधले!

ही शंकर-पार्वतीची कथा एक प्रेमकथा सुद्धा आहे. शंकराला मिळवण्यासाठी एकीकडे पार्वतीचे ‘अपर्णा’ होणे. आणि दुसरीकडे पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारायच्या आधी शंकराचे मदनाला जाळून भस्म करणे! वासनारहित शुद्ध प्रेम हा या दिव्य जोडप्याच्या वैवाहिक जीवनाचा पाया आहे.


शिव-पार्वतीचा संसार पौराणिक कथांमधून डोकावत राहतो. कधी दोघे मिळून विमानातून site-seeing करत हिंडत असतात. तर कधी कैलासावर बसून, एकांतात गप्पा गोष्टी करत असतात. कधी भांडण नाही, तंटा नाही, रुसवा नाही, काहीच नाही! नाही म्हणायला या चित्रात मात्र काहीतरी बिनसल्या सारखे वाटते –वरवर असे दिसते की अचेतन शंकरावर कालीरूपी पार्वती उभी आहे. पण या चित्रातून शंकर हेच दाखवतो की - “शक्ती शिवाय शिव मृतवत आहे”. हे चित्र शिव-पार्वतीचे अद्वैत अधोरेखित करते.

आपल्याकडे लग्नाच्या आधी वधूने “गौरीहर” पूजायची पद्धत आहे. ती पूजा म्हणजे शिव-पार्वती प्रमाणे आपला संसार देखील गोड व्हावा, त्यांच्या प्रमाणे आपल्यात एकवाक्याता असावी ह्या हेतुने केलेली प्रार्थना. आजच्या काळात तर, एकांतात फोन घेऊन बसण्यापेक्षा आम्ही एकमेकांशी गुजगोष्टी कराव्यात अशीही प्रार्थना करायची वेळ आली आहे!

आणि हाच धडा, विसरू नये म्हणून, दर वर्षी गिरवायला हरतालिकेच्या पूजेचे प्रयोजन. पार्वती प्रमाणे तुम्ही-आम्ही पण नव-याच्या गळ्यातील ताईत व्हावे म्हणून ही पूजा. आपल्या सदगुणांनी(?), सासरच्या लोकांना आपलसे करून, नवऱ्याच्या आवडी-निवडी ओळखून, त्याची सखी होऊ. मग ताईत व्हायला काय अवकाश?

आजकालचा रोष बघता ही पूजा कशी ‘पुरुष प्रधान संस्कृतीचे द्योतक आहे’ असे म्हणून नाक उडवले जाऊ शकते. पण मला तरी असे वाटते की संसार सुखाचा होण्यासाठी दिलेला हा एक कथारूपी उपदेश आहे. मागच्या काळात हरतलिका पुजून, उपास करायची पद्धत रूढ झाली. कालानुरूप ही पद्धत बदलू शकते. उपास करायच्या ऐवजी पती पत्नीने अगदी विमानातून नाही पण पायी फिरून यावे, किंवा सायकल वरून डबल – सीट फिरून यावे! एकूण एकमेकांना वेळ द्यावा आणि पद्धत बदलली तरी त्या मागचा उद्देश मात्र सुटू देऊ नये.

हा सण म्हणजे पती-पत्नीच्या प्रेमाचा उत्सव आहे. कधी पत्नीने, वट-सावित्रीला किंवा हरतलिकेला, आपले प्रेम व्यक्त करायचे. तर कधी पाडव्याला पतीने पत्नीला ओवाळणी घालून तिचे कौतुक करायचं. Valentine Day ला नाही का भेटवस्तू नाहीतर फुले देऊन प्रेम व्यक्त करतात? अगदी तसच. लग्नाच्या आधी आपल्या प्रेमिकेला फुले वगैरे देणे छानच आहे, पण एकाच spouse ला, वर्षानुवर्ष, रोजच्या धबडग्यात जे राहून जाऊ शकते, ते प्रेम व्यक्त करत राहणे ही निश्चितच त्याच्या पुढची पायरी आहे! 

- दिपाली पाटवदकर