जिल्ह्यातील गणेशोत्सवाला कायद्याचे बंधन

    दिनांक  22-Aug-2017बुलढाणा : येत्या २५ तारखेपासून जिल्ह्यासह राज्यभरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात होणाऱ असली तरी जिल्ह्यात मात्र गणेशोत्सवाला कायद्याची अनेक बंधने लादण्यात आली आहेत. जिल्ह्यात सार्वजनिक रस्त्यावर अथवा रस्त्याच्या आसपास सार्वजनिक शांतता भंग न होण्याच्यादृष्टीने गणेशोत्सवा निमित्त होणारे मेळावे, दिंडी, मिरवणूकीत भाग घेणाऱ्या लोकांच्या नियमनाकरीता मुंबई पोलीस कायदा १९५१च्या कलम ३३, ३७ व ४० प्रमाणे निर्बंध घालण्यात आल्याचे जिल्हा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे उत्सवा दरम्यान मिरवणूक अथवा दिंडी काढण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील पोलिसांकडून बजावण्यात आले आहे.


येत्या २५ तारखेला सकाळी ६ वाजल्यापासून ते ५ सप्टेंबरच्या रात्री १० वाजेपर्यंत हा नियम लागू करण्यात येणार आहे. गणेशोत्सवामध्ये कुणालाही मेळावे, पालख्या, वाद्यासहीत मिरवणूक काढावयाची असल्यास त्या व्यक्तीने ३६ तासांपूर्वी संबंधीत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून लेखी परवानगी घेतली पाहिजे, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. परवानगी मिळवण्यासाठी मुख्य आयोजकाचे नाव व पत्ता, परवाना पाहिजे असण्याचे कारण, मेळावा अथवा मिरवणूकीचे वर्णन व मंडळाचे नाव, कोणकोणत्या ठिकाणी जाण्याकरीता परवाना पाहिजे ती तारिख व वेळ, ज्या रस्त्याने मिरवणूक जाणार असेल तो रस्ता, ज्या तारखेचा किंवा वेळेचा परवाना पाहिजे ती तारिख व वेळ, मिरवणूक चालकाचे व सदस्यांचे पूर्ण नाव, पत्ता, मुख्य आयोजकाने मिरवणूकीतील किंवा मेळाव्यातील प्रत्येक व्यक्तीचे योग्य शांत वर्तनाबद्दल तो स्वत: जबाबदार आहे असे अर्जावर लिहून देणे आवश्यक आहे. तसेच मशीद जवळून मिरवणूक जातांना मशीदीपुढे न थांबता पुढे निघून जावे. रेंगाळू नये. तसेच मिरवणूकीत कोणत्याही परवान्याशिवाय अग्नीशस्त्र, मशाल, तलवार, खंजीर, कट्यार, चाकू, काठ्या, बांबू, छोटे दगड आदीपैकी दुखापत करता येणारे साहित्य घेवून जावू नये असे देखील पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.